गरजूंना डावलले,नातेवाईकांना लाभ

85

गरजूंना डावलले,नातेवाईकांना लाभ
घरकूलच्या लाभासाठी पात्र असूनही
पहिल्या तेहतीस मध्ये डावलले
भादूर्णीतील जनतेची व्यथा
मूल :- विनायक रेकलवार
इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी मोदी आवास घरकूल योजना राबविली जाते.या योजनेत बरेच नागरिक पात्र ठरले.242 जणांची यादी तयार झाली. परंतु ख-या गरजवंतांची नावे पहिल्या तेहतीस मध्ये नाही. सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संगनमताने त्यांना लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप होत आहे. हा सपूंर्ण घोळ भादूर्णी ग्रामपंचायत येथे घडला.येथील सोळा गरजु लाभार्थी नागरिकांनी आपली व्यथा मूल येथे सांगितली.त्यापैकी एकाने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे. आम्हाला घरकुलची खरी गरज असतानाही का डावलल्या जात आहे,असा त्यांचा प्रशासनास सवाल आहे. पहिल्या यादीत आम्हाला समाविष्ठ करा अन्यथा ग्रामपंचायतच्या कार्यालयात बैठा सत्याग्रह करू असा इशारा त्यांनी दिला. मूल पंचायत समिती अंतर्गत अडीच हजार लोकसंख्येच्या वर असलेले भादूर्णी ग्राम पंचायत आहे. येथील इतर मागास वर्ग प्रवर्गातील नागरिक पंधरा ते वीस वर्षांपासून घरकूल पासून वंचित आहेत.याआधी गावात एससी,एसटी,अल्पसंख्याक व इतर घटकातील प्रवर्गासाठी प्रधानमंत्री घरकूल योजना राबविली गेली.सन 2021-2022 च्या दरम्यान मोदी आवास घरकूल योजनेस सुरूवात झाली.त्यात इतर मागास प्रवर्गातील नागरिक बरेचसे नागरिक पात्र ठरले.सर्वांसाठी घरे 2024 हे राज्यशासनाचे उदिदष्ट आहे.त्यानुसार बेघर,कच्च्या घरात असणा-या पात्र लाभार्थ्यांना पहिले याचा खरा लाभ मिळायला पाहिजे.परंतु, तसे न होता,भादूर्णीतील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने दुस-यानाच घरकूलचा सुरूवातीस लाभ दिला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.त्यात त्यांचे नातेवाईक,याआधी घरकूलचा लाभ घेतलेले आणि जवळचेच लोक असल्याचे गावकरी सांगतात. मात्र,पात्र असलेल्यांना मुददामहून पहिल्या लाभापासून डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. लाभापासून वंचित असलेल्यापैकी ब-याच लोकांची घरे ही कुडया मातीची, पडक्या अवस्थेतील आहेत.जंगलातील हिंस्त्र प्राण्यांची,पावसाळयात घरे पडण्याची त्यांना भिती आहे. तरीही त्यांना लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप होत आहे.मूल मध्ये आपली व्यथा सांगण्यासाठी भादूर्णी येथील शंकर सोनूले,रविंद्र कावळे,विकेश चौधरी,माधुरी मोहूर्ले,अर्चना सोनूले यांच्या महिला व पुरूष मंडळी उपस्थित होती.

” भादूर्णी ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने कारभार सुरू आहे.त्यात नागरिकांना मते विचारात घेतल्या जात नाही.ग्रामसभा बोलावल्या जात नाही.ख-या लाभार्थ्यांना घरकूल पासून वंचित ठेवण्याचा प्रकार येथे सुरू आहे.नातेवाईकांना पहिला लाभ दिला जात आहे.मी माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली आहे.पहिल्या यादीत गरजुना लाभ न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात बैठा सत्याग्रह करू.”
विकेश चौधरी,भादूर्णी

गरजु लाभार्थ्यांची कुड्या मातीची घरे