विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल राजगड
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
मूल :-राजगड येथील नागरिकांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी अनेक विकासकामे केली आहेत. सिंचनाची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, रस्ते, ड्रेनेज तसेच गावांच्या विकासासाठी कधी नव्हे एवढा निधी दिला. येथील तलावाचे नूतनीकरण, हेमाडपंती मंदिराचा जिर्णोद्धार तसेच पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या काळात राजगडला विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेले असेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
राजगड, भवराळा आणि बोरचांदली येथील नागरिकांशी संवाद साधताना ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. बल्लारपूर विधानसभेचा विकासाचा रथ धावत राहण्यासाठी राजगडच्या मतदारांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरेल असेही ते म्हणाले. ते म्हणाले, ‘या मतदारसंघात कृषी, वन आणि खनिज संपदेवर आधारित तीन मोठे उद्योग उभे होत आहेत. मुल एम.आय.डी.सी.मध्ये अनेक उद्योग उभे केले असून 4 हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला. मुल-पोंभूर्णाच्या दरम्यान 5 हजार एकराच्या जागेत 40 हजार कोटीची गुतंवणूक करुन लक्ष्मी मित्तल ग्रुपचा पोलाद उद्योग उभा होत आहे.’
‘राजगड, जुनासुर्ला, गडीसुर्ला, निमगाव, नवेगाव, नांदगाव, घोसरी, भेजगाव या क्षेत्रातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले. बचतगटांचे सशक्तीकरण तसेच बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी उत्तम बाजारपेठ चंद्रपुरात उभी राहत आहे. महिला बचत गटांना सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देणारा चंद्रपूर राज्यात एकमेव जिल्हा आहे,’ असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.
नागरिकांची आरोग्य तपासणी, नेत्रचिकित्सा शिबिर, मोतीबिंदू ऑपरेशन तसेच चष्म्यांचे वाटप केले. मागील वर्षी गोरगरिबांना 5 हजार घरकुले उपलब्ध करुन दिली. राजगडमधील तिर्थक्षेत्र असलेल्या हेमाडपंती मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या गावातील पाणीपुरवठा योजना प्राधान्याने सुरू करेल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.
*जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा*
राजगडमध्ये समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले. कोरोना काळात सरकार नसताना देखील पाचशे पीपीई किट, ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर, रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य केले. आमदार आणि मंत्री होण्यापेक्षा गोरगरीब जनतेचा आशिर्वाद सर्वात जास्त महत्त्वाचा असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.