मूल येथील उप जिल्हा रूग्णालयाचा डोलारा प्रभारीवर
राम भरोसे कारभारामुळे रेफर टु चंद्रपूर
राम भरोसे कारभारामुळे रेफर टु चंद्रपूर
मूल :- विनायक रेकलवार
मागिल अनेक वर्षांपासून येथील उपजिल्हा रूग्णालयाचा डोलारा प्रभारीच्या खांदयावर आहे.तदवतच रूग्णालयातील नियमित असलेली रिक्त पदे सुदधा भरल्या गेली नाही. त्यामुळे येथील आरोग्य सुविधेवर परिणाम होत आहे. शासन आणि प्रशासनाकडे लक्ष दयायला वेळ नसल्याने रूग्णालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. मूल मध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांची आवश्यकता असताना सुदधा ती पदे भरल्या जात नसल्याने रेफर टू चंद्रपूर अशी अवस्था येथील रूग्णालयाची झालेली आहे.पन्नास खाटांचे असलेल्या रूग्णालयातील रिक्त पदांचे ग्रहण केव्हा सुटणार आणि तज्ज्ञ पदे भरणार केव्हा ? असा सवाल तालुकावासिय करीत आहे. नागरिकांच्या मागणी नुसार तीस खाटांचे रूग्णालय पन्नास खाटांचे बनविण्यात आले.त्यांनतर ग्रामिण रूग्णालयाला उप जिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाला. भव्य इमारत तयार झाली.तत्कालिन आरोग्य मंत्री द्विग्विजय खानविलकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.उत्तम आरोग्यसेवेची हमी देण्यात आली.मात्र,मागिल काही वर्षांपासून येथील आरोग्य सेवा वैद्यकीय अधिका-यांअभावी ढेपाळली जात आहे. तालुक्यातील रूग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा वाढीव पन्नास खाटांची मागणी करण्यात आली. ती मागणी शासन दरबारी रेंगाळत असताना मूल मध्ये नवीन शंभर खाटांच्या भव्य रूग्णालयाला मंजूरी मिळाली.त्याच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.यासाठी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अथक प्रयत्न केले. नवीन रूग्णालयाच्या इमारतीला बराच वर्षाचा कालावधी असला तरी विदयमान उपजिल्हा रूग्णालय प्रभारीच्या खांदयावर सोडल्या गेला आहे. प्रभारी वैद्यकीय अधिक्षक राजूरा येथून जाणे येणे करतात. आकस्मिक सेवा असलेले रूग्णालय चोविस तास जनतेच्या सेवेत असणे गरजेचे आहे.मात्र ,कंत्राटी आणि आयुषच्या वैद्यकीय अधिका-यांवर भार सोडून प्रभारी मोकळे होत आहेत. डॉ.गुंडावार आणि डॉ.बाबर हे दोन नियमित वैद्यकीय अधिक्षक सोडल्यास बाकी वेळेला मूलच्या उपजिल्हा रूग्णालयाचा कारभार प्रभारीच्या खांदयावरच टाकल्या गेलेला आहे. त्याच बरोबर येथील अनेक पदे रिक्त आहेत. स्त्री रोग तज्ज्ञ,दंत रोग,बधिरीकरण तज्ज्ञ,अस्थिरोग तज्ज्ञ,बालरोग तज्ज्ञ अशा नियमित पदांबाबत रूग्णालय वंचित आहे. सोनोग्राफी मशीन असली तरी तज्ज्ञ आठवडयातून दोन वेळा येत असल्याने रूग्णांना ताटकळत राहावे लागते.सोनोग्राफी अभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रूग्णांना रेफर टू चंद्रपूर केले जाते. पन्नास खाटांच्या रूग्णालयाचे करायचे काय ?असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले मूल हे निम शहरी भाग आहे.येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी येण्यास मागे पुढे पाहत असल्याने उत्तम आणि दर्जेदार आरोग्याची सेवा मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. तालुकास्तरीय रूग्ण कल्याण समितीचे सुदधा दुर्लक्ष होत असल्याने उप जिल्हा रूग्णालय वा-यावर सापडले आहे. वातावरणातील बदल आणि विविध कारणांमुळे येथे उपचार घेणा-या रूग्णांची संख्या अधिक आहे.त्यामानाने उपचारासाठी तज्ज्ञांची कमतरता भासत असल्याने नागरिकांमध्ये रूग्णालयाविषयी कमालीची नाराजी आहे.
कक्ष निहाय खाटा
पुरूष वैद्यकीय कक्ष – मंजूर खाटा 16
स्त्री वैद्यकीय कक्ष – मंजूर खाटा 16
बलरोग कक्ष – मंजूर खाटा 6
प्रसुती पश्चात कक्ष – मंजूर खाटा 12
एकूण – मंजूर खाटा 50
पुरूष वैद्यकीय कक्ष – मंजूर खाटा 16
स्त्री वैद्यकीय कक्ष – मंजूर खाटा 16
बलरोग कक्ष – मंजूर खाटा 6
प्रसुती पश्चात कक्ष – मंजूर खाटा 12
एकूण – मंजूर खाटा 50
प्रतिक्रिया :- मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षकाचे नियमित पद भरण्यात आले नाही. तसेच येथील विविध तज्ज्ञ पदे तात्काळ भरावीत अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. तालुक्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी,रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे या भावनेतून सर्वांचेच आरोग्य आनंदीत राहावे,यासाठी शासन आणि प्रशासनाने उपजिल्हा रूग्णालयाकडे लक्ष पुरवावे.येथील सोयी सुविधा वेळीच उपलब्ध करून दयाव्यात.
– संध्याताई गुरूनूले,माजी अध्यक्ष,जि.प.चंद्रपूर.
– संध्याताई गुरूनूले,माजी अध्यक्ष,जि.प.चंद्रपूर.
