चिमण्यांसाठी राहूलची धडपड

99

चिमण्यांसाठी राहूलची धडपड

मूल – चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारेजीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा… असे ऐकत म्हणतच बहुतेकाचे बालपण गेले. मात्र, अंगणात येणारी चिमणी निदान शहरी भागातून तरी लुप्त होऊ लागली होती. या चिमण्यांना सिमेंटच्या जंगलात हक्काचे घर मिळावे, म्हणून मूल शहरामध्ये राहुल आगडे हा अवलिया धडपडत आहेत. आजवर त्यांनी चिमण्यांच्या संवर्धनासाठी संसार थाटला असून, या घरट्यांतून चिवचिवाट वाढला आहे.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. मनुष्यासह मुक्या प्राण्यांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. अशा तप्त उन्हात पशुपक्ष्यांना पाणी व अन्नावाचून धोका होऊ नये, यासाठी मूल येथील पक्षीमित्र राहुल आगडे यांनी चिमण्या व इतर पक्ष्यांसाठी चक्क आपल्या घरी पक्षी घरकुलाची निर्मिती केली आहे. तेथे अन्न व पाण्याची सोयही केली आहे.
पशुपक्षी प्रेमासाठी राहुलचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत
आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान देशात सर्वोच्च पातळीवर असते. तप्त उन्हाच्या झळामुळे बरेच पशुपक्षी तडफडत रस्त्यावर मरनासन्न अवस्थेत दिसून येतात, ही स्थिती बघून पक्षीमित्र राहुल आगडे यांनी घरी पक्षी घरकुल बांधले आहे. येथे येणाऱ्या चिमुकल्या चिमण्या व इतर पक्ष्यांसाठी याच ठिकाणी पक्ष्यांकरिता पाण्यासाठी जलपात्र बांधण्यात आले आहे. त्याच्या या घरकुलात अनेक पशुपक्षी येत असल्याचे दिसून येते.