मूल मध्ये उन्हाळयात पाणी टंचाई भासू देणार नाही – नगराध्यक्षा एकता समर्थ यांची ग्वाही — राजकीय द्वेषापोटी वारंवार वीज कपात करण्याचा डाव

215
मूल मध्ये उन्हाळयात पाणी टंचाई भासू देणार नाही – नगराध्यक्षा एकता समर्थ यांची ग्वाही
राजकीय द्वेषापोटी वारंवार वीज कपात करण्याचा डाव
मूल:- येथील पाणी पुरवठा योजनेला  राजकीय द्वेषापोटी अडचणीत आणल्या जात आहे. थकीत बील भरल्यानंतरही वारंवार पाणी पुरवठयाची वीज कपात करण्यात आली. हा मोठा राजकीय डाव असल्याचे उघडकीस येत आहे. वीज कपातीचे संकट अजूनही कायम आहे. त्याला वीज वितरण कंपनी खतपाणी घालत आहे. परंतु,उन्हाळयात मूल मध्ये कदापीही  पाणी टंचाई भासू देणार नाही, अशी  खणखणीत ग्वाही कॉग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ आणि उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी दिली.   मूल नगर पालिका सभागृहात शुक्रवारी ( 20 मार्च )सायंकाळी पाणी टंचाई बाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत  अध्यक्ष,उपाध्यक्ष बोलत होते. यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात  यामागे बोलविता धनी वेगळाच असल्याची दाट शंका व्यक्त केली. पाणी पुरवठा योजनेची वीज वारंवार खंडीत का होते ?  याबाबत  वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना विचारणा केली आहे.तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे सांगितले आहे. पाणी पुरवठा योजना ही अत्यावश्यक सेवा असतानाही कंपनीचे कृत्य हे अत्यंत गैरजबाबदारीचे आणि निषेधार्य असल्याचे समर्थ आणि रत्नावार यांनी यावेळी सांगितले.  प्रशासक काळापासून पाणी पुरवठा योजनेवर 65 लाख रूपयांचे थकीत वीज बील होते.पालिकेमध्ये 5 जानेवारी 2026 रोजी कॉग्रेसची सत्ता पदारूढ झाली. असे असतानाही थकीत बीलापोटी वीज वितरण कंपनीने विविध कारणे दाखवून पाणी पुरवठा योजनेतील वीज जानेवारी महिण्यात एकदा आणि फेब्रुवारी महिण्यात तीनदा कपात केली. त्यामुळे येथील पाणीपुरवठा खंडित झाला आणि जनतेचा रोष प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पत्करावा लागला. परंतु , पालिकेने  जानेवारी महिण्यात दोनदा आणि फेब्रुवारी महिण्यात तीनदा वीज वितरण कंपनीचे थकीत पैसे भरले.असे एकूण चाळीस लाख 88 हजार रूपयंाचा भरणा केला असतानाही कंपनीने पाणी पुरवठा विभागाच्या अभियंतांना पुन्हा पैसे भरा अशी सरळ धमकीच दिली. ही  कृती अकलेचे तारे तोडणारी असल्याचे  नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.   शहरवासियांच्या हिताचा विचार न करता वीज वितरण कंपनीचे हे कार्य सुडबुदधीचे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पोंभूर्णा येथे करोडो रूपयाचे वीज बील थकीत असताना तेथील वीज कापल्या गेली नाही ?  परंतु, कॉंग्रेसची सत्ता असलेल्या  मूल मध्येच वीज वितरण कंपनीची वक्रदृष्टी का ? अधिकारी दबावात काम करतात काय?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या हितासाठी आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पुढील वाटचाल सुरूळीत सुरू राहणार असून मूलमध्ये  उन्हाळयात आम्ही पाणी टंचाई भासू देणार नाही. टंचाई स्थिती निर्माण झाल्यास विविध उपाययोजनाबाबत आमचा आराखडा तयार असल्याचे एकता समर्थ यांनी सांगितले. नगर पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस असली तरी,15 वे वित्त  आयोगाच्या निधीतून विविध कामे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.सदया,पाणी पुरवठा योजनेच्या विविध कामासाठी लाखो रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्षा समर्थ यांनी सांगितले.निधी साठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राकेश रत्नावार,पाणी पुरवठा सभापती विलास कागदेलवार,बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, शिक्षण सभापती लीना फुलझेले, महिला व बालकल्याण उपसभापती समिक्षा कडस्कर,नगरसेवक अशोक येरमे,विवेक मुत्यलवार,राहूल प्रेमलवार,नगरसेविका ज्योती चटारे,काजल धारणे,उज्वला कामडी,सुशिला खोब्रागडे,स्वीकृत सदस्य गुलाब पठाण,पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कॉंग्रेस भवनात पुराव्यासह उत्तर देवू – राकेश रत्नावार
मूल:- पाणी पुरवठा योजनेतील वीज कपाती बाबत वीज वितरण कंपनीवर राजकीय दबाव आहे काय,या प्रश्नाच्या उत्तरात  बोलताना उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी यामागे बोलविता धनी वेगळाच असल्याची शंका उपस्थित केली. कॉंग्रेसच्या सत्तेला अडचणीत कसे आणता येईल,हा एक मोठा राजकीय डाव आहे. याबाबत,कॉंग्रेस भवनात योग्य पुराव्यासह पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी संागितले