रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करा – रूमदेव गोहणे यांची मागणी

108
रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करा – रूमदेव गोहणे यांची मागणी
मूल:- येथील रयत नागरी सहकारी पतसंस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी संस्थेचे आजीवन सभासद आणि माजी संचालक रूमदेव गोहणे यांनी केली. मूल मध्ये पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संस्थेचे अध्यक्ष निमचंद शेरकी यांचे विरूदध विविध आरोप लावले. संस्थेतील गैरव्यवहार,भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराविरूदध सहाय्यक निबंधक,जिल्हाधिकारी,सहकार आयुक्त,विभागीय सहनिबंधक,नागपूर,जिल्हा उपनिबंधक,आणि जिल्हा लेखा परिक्षक सहकारी संस्था,चंद्रपूर यांचे कडे तक्रार करण्यात आले असल्याचे गोहणे यांनी सांगितले.सन 2023-24 या आर्थिक वर्षात पतसंस्था वैधानिक लेखा परिक्षणामध्ये दोषी आढळल्याचे गोहणे म्हणाले.पतसंस्थेविषयी सहाय्यक निबंधकांनी विविध शेरे लावले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आम्ही आजीवन सभासद असताना सुदधा वार्षिक आमसभेेला बोलाविल्या जात नाही.वार्षिक अहवाल सुदधा देत नसल्याचे गोहणे यांनी यावेळी सांगितले. पतसंस्थेचे सभासद,ठेवीदार,कर्मचारी,अभिकर्ता यांचे आर्थिक नुकसान होवू नये आणि सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी 14 एप्रिल पासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे रूमदेव गोहणे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला माजी मानद सचिव प्रशांत भरटकर,गुरूदास गोहणे,विनोद भरटकर, पदमाकर नारनवरे,माया कटमलवार,रामदास चटारे,दिपक गोहणे,भारती राखडे उपस्थित होते.


आरोप बिनबुडाचे – निमचंद शेरकी
माजी संचालक रूमदेव गोहणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे मत रयत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष निमचंद शेरकी यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.पतसंस्थेचे कार्य उत्कृष्ट रित्या सुरू आहे. जिल्हयात नावलौकीक असताना पतसंस्था सक्षमपणे काम करीत आहे.उलट त्यांनाच संस्थेविरूदध कार्यवाही आणि गैरवर्तणुक केल्या प्रकरणी निष्काषित केल्याचे शेरकी यांनी म्हटले. चौकशीत जे निष्पन्न होईल ते मान्य राहील.आपण कोणताही भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार केला नाही. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष दिनेश पडगेलवार,मुख्य कार्यपालन अधिकारी ज्ञानेश्वर सेगोकार,केवटराम खेवले,प्रा.हरिश रायपूरे,दिलीप चिताडे,जयश्री झरकर,वर्षा नागपूरे,श्वेता शेरकी,अॅड.प्रीतम नागापूरे आदी संचालक मंडळी आणि पंकज आसमवार वसूली अधिकारी उपस्थित होते.