निर्माणाधिन असलेल्या रेल्वे मालधक्क्याचा नगर परिषदेने विरोध करावा – मालधक्का हटाव संघर्ष समितीची नगराध्यक्ष यांना विनंती

193

निर्माणाधिन असलेल्या रेल्वे मालधक्क्याचा नगर परिषदेने विरोध करावा

मालधक्का हटाव संघर्ष समितीची नगराध्यक्ष यांना विनंती

मूल : नगर परिषद हद्दीतील नागरीकांच्या जीवीत आणि मालमत्तेचे संरक्षणासाठी मूल शहरालगत निर्माणाधिन असलेल्या रेल्वे मालधक्याचा विरोध करून तश्या प्रकारचा ठराव मंजुर करावा. अशी मागणी मालधक्का हटाव संघर्ष समितीच्या वतीने नगराध्यक्ष यांना करण्यांत आली.
मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ हयांना दिलेल्या निवेदनात संघर्ष समितीने मूल शहरालगत मालधक्का निर्माण झाल्यास ध्वनी आणि वायु प्रदुषणामूळे शहरवासीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडणार आहे. मालधक्क्यामूळे शहरामधून जाणा-या वाहतुकीत वाढ होणार असून वाहणांच्या वर्दळीमूळे अपघाताची शक्यता असून दुचाकी आणि पादचा-यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिल्या जात असले तरी प्रत्यक्षात रेल्वे मालधक्क्यावर जेसीबी आणि इतर यंत्राचा वापर होणार असल्याने बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेलचं, हे सध्यातरी न सांगता येणारे आहे. निर्माणाधिन असलेल्या रेल्वे स्टेशन लगत महाविद्यालय, काॅन्व्हेंट, लोकवस्ती आणि थोडया दूर अंतरावर उपजिल्हा रूग्णालय असल्यामूळे मालधक्याचा या घटकांवर विपरीत परिणाम होणार आहे. निर्माणाधिन असलेल्या मालधक्यालगत मोठे आणि निसर्गरम्य वातावरण असलेले पटांगण असून दररोज सकाळी आणि संध्याकाळी शहरातील आबाल स्त्री-पुुरूष आणि बालगोपाल मंडळी आरोग्याच्या दृष्टीने फिरायला तर अनेकजन खेळायला जात असतात. मालधक्का निर्माण झाल्यास शहरातील आबाल स्त्री पुरूषांच्या फिरायला जाण्याच्या नियमितच्या सवयीवर निर्बंध येणार आहे. त्यामूळे नागरीकांना त्रास दायक आणि डोकेदुखी ठरणारा निर्माणाधिन रेल्वे मालधक्का मूल शहरालगत होवू नये. याकरीता मूल नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत आवाजी मताने ठराव पारीत करून मालधक्का हटाव शहर बचाव या मागणीचे समर्थन करावे. अशी विनंती केली आहे. यावेळी नगराध्यक्ष सौ. एकता समर्थ यांनी लोकभावना आणि मागणीची दखल घेवून नगर प्रशासन नागरीकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. असे आश्वासन देवून मालधक्का विरोधी ठराव मंजुर करेल. असा विश्वास दिला. यावेळी नगर परिषद बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगरसेवक विवेक मुत्यलवार, अशोक येरमे यांचेसह संघर्ष समितीचे बहुसंख्य पदाधिकारी आणि विविध सामाजीक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.