बैल पोळा सणाच्या दिवशी – कापूस उत्पादक शेतक-याने वेधले लक्ष – धानाला आणि कापसाला भाव देण्याची मागणी

204
 बैल पोळा सणाच्या दिवशी
कापूस उत्पादक शेतक-याने वेधले लक्ष
धानाला आणि कापसाला भाव देण्याची मागणी
मूल ः-
  मूल तालुका धान उत्पादक पटटा म्हणून पंचक्रोशीत प्रसिदध आहे. 26 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे .  तालुक्यात आणि परिसरात धानाचे क्षेत्र अधिक असल्याने मूल येथे  राईस मील सुदधा जास्त आहे. येथिल उच्च आणि उत्तम दर्जाचा  तांदूळ राज्याच्या राजधानी पर्यंत प्रसिदध आहे.अशा धानाच्या पटटयात ‘ कापूस उत्पादक शेतकरी ‘ असा आशय लिहलेली  बैल जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. औचित्य होते मूल मध्ये सोमवारी साजरा झालेल्या बैल पोळा सणाचे. मूल येथे गुजरी चौकात बैल पोळा भरतो.शेतकरी आपआपली बैलजोडी सजवून,साजश्रृंगार करून,नवीन झूल चढवून येथे आणतो. एक प्रकारे बैलजोडी प्रदर्शीत केल्या जाते. अशीच एक बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.  मूल येथील प्रगतशिल आणि प्रयोगशिल शेतकरी मनोज कावळे यांची ही बैलजोडी होती. बैलजोडीच्या अंगावर कापूस उत्पादक शेतकरी असा आशय लिहलेला होता.त्यांच्या दुस-या जोडीवर शेतकरी टिकेल तरच, शेती पिकेल असा मजकूर लिहलेला होता.दोन्ही बैलजोडीवर लिहलेला मजकूर उपस्थितांना विचार करायला लावणारा होता.शेतकरी हा देशाचा कणा आहे.जगाचा पोशिंदा आहे.बैल जोडी हे त्याचे दैवत आहे. पशुधन हे त्याचे आधार स्तंभ आहेत. त्याच शेतक-याला आपल्या मागणीसाठी लढावे लागत आहे. एकीकडे शेतक-यांच्या पीकाला,शेतमालाला भाव नाही.दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी राजा सापडला आहे. त्या दृष्टीने मनोज कावळे यांची ही  कल्पना लक्ष वेधून घेणारी ठरली. पोळा सणाच्या निमित्ताने शेतक-याने केलेली ही मागणी रास्त असली तरी,  शासन दरबारी पोहचेल काय ? याविषयी पोळयात चर्चा होती.

शेतमालाला भाव नाही :- धानाची मुख्य बाजार पेठ असतानाही धानाला भाव नाही.तसेच कापसाला सुदधा भाव नाही. नगदी पीक म्हणून कापसाकडे बघीतले जाते.बरेचशे शेतकरी कापूस पीकाच्या लागवडी कडे वळले आहेत.परंतु कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कापसाला आणि धानाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी टिकेल तरच,शेती टिकेल , असे मत मनोज कावळे यांनी जनतेचा आवाज सोबत बोलताना आपले मत व्यक्त केले.