नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा – पाच गावच्या सरपंचांची  मागणी – अन्यथा आंदोलनाचा इशारा

102

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा
पाच गावच्या सरपंचांची  मागणी,अन्यथा आंदोलनाचा इशारा
मूल
 :- मरेगाव, आकापूर, चिमढा, चितेगाव,टेकाडी या परिसरात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या पाच गावच्या सरपंचांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप कारमवार यांच्या नेतृत्वात विभागीय वन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.नुकतेच मरेगाव येथिल शेतकरी वासूदेव पेंदाम याला चितेगावच्या नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार  केले होते. याआधी उन्हाळयात मरेगाव येथे गावातील शेतक-यांच्या जनावरांवर हल्ला करून गायी आणि म्हशींना मारले होते. मागिल अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघ या  पाचही गावांमध्ये धुमाकूळ घालीत आहे. त्यामुळे चितेगाव, मरेगाव चिमढा,टेकाडी आणि आकापूर या वनव्याप्त परिसरातील शेतक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.शेतकरी शेतमजूर आणि गुराख्यांच्या जनजीवनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. वाघाच्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या भितीमुळे शेतीची कामे खोळंबली जात आहे. शेती आणि वन परिसर लागूनच असल्याने शेतक-यांना आपला जीव मुठीत घेवून धानाच्या शेतीत लक्ष घालावे लागत आहे. वाघाच्या भितीमुळे शेतमजूर धास्तावल्याने शेतीच्या कामासाठी महिला आणि पुरूष मिळणे कठीण काम झाले आहे. शेतकरी वर्गांनी आणि शेतमजूरांनी जगावे कसे ,असा प्रश्न निर्माण झाला आहे.परिसरात मानव – वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.त्यामुळे येथील धानाची आणि इतर पीकांची शेती धोक्यात आली आहे. तसेच जनावरांच्या चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकरी ,शेतमजूर आणि गुराख्यांचा विचार करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा आणि त्यांना न्याय दयावा अशी मागणी सरपंचानी केली आहे.अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. सावली वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्फतीने प्रादेशिकचे विभागीय वन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळामध्ये बाजार समितीचे संचालक संदीप कारमवार,आकापूरचे सरपंच भास्कर हजारे,चितेगावचे सरपंच कोमल रंदये  ,मरेगावचे सरपंच जोत्सना पेंदोर,चिमढयाचे सरपंच कालिदास खोब्रागडे,टेकाडीचे सरपंच सतिश चौधरी उपस्थित होते.
पाचही गावच्या सरपंचांनी आपआपल्या ग्रामपंचायतच्या मार्फतीने वनअधिका-यांना निवेदन दिले.
” रोजच्या वाघांच्या हल्ल्यामुळे गावकरी बेजार झाले असून निष्पाप जीवांचा नाहक बळी जात आहे.वनव्याप्त गावांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण पसरले आहे.शेतकरी ,शेतमजूर आणि यावर आधारीत इतर घटकांनी आपले जीवन जगावे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सदया धानाच्या शेतीला पाण्याची आवश्यकता आहे.पाणी करण्यासाठी शेतक-यांना शेतात जावे लागत आहे.पशुपालनही आवश्यक आहे.चराईसाठी जनावरांना बाहेर नेणे गरजेचे आहे. त्यामुळे धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघाचा आणि परिसरातील इतर वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावे लागेल. “
– श्री.संदीप कारमवार,संचालक ,कृषी उत्पन्न बाजार समिती,मूल.