संपादकीय – कोणाला पावणार बाप्पा ? एक पत्र बाप्पा तुझ्यासाठी

205
विधानसभेचे वारे
कोणाला पावणार बाप्पा ?
एक पत्र बाप्पा तुझ्यासाठी
प्रिय,
आद.माय गणेशा
अर्थात बाप्पा.
विषय :- एकीकडे यात्रा,दुसरीकडे गाठीभेटी,तिसरीकडे बॅनरबॉजी.मग,कोणाला पावणार बाप्पा ?
सप्रेम नमस्कार.
बाप्पा , महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे वेध लागले आहे. निवडणुकीची तारीख घोषीत होण्याची प्रतिक्षा आहे. निवडणूक विभाग आणि प्रशासन कामाला लागला आहे.राष्ट्रीय पक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांची मतदार संघासाठी  उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. कोणाला तिकीट अर्थात पक्षाची उमेदवारी मिळेल याची मतदारांना मोठी उत्सुकता आहे. त्या दृष्टीने बल्लारपूर विधानसभा -72 सुदधा मागे नाही. या मतदार संघातही विधानसभेचे वारे घोंघावत आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षाचे आणि इच्छूक उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. मतदारां पर्यत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. एकीकडे पदयात्रा काढल्या जात आहे.दुसरीकडे गाठीभेटी सुरू आहे.तर तिसरीकडे शुभेच्छांची बॅनरबाजी केल्या जात आहे. सदया सण समारंभाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे इच्छूकांसाठी ही एक संधी असली तरी,मतदारांना मात्र, सुगीचे दिवस आले आहेत. बाप्पा, तुझा गणेशोत्सव सुरू आहे.सर्वच पक्षांच्या इच्छूक उमेदवारांकडून बॅनरबाजी सुरू आहे. मात्र,प्रत्यक्षात बाप्पा तू कोणाला पावणार हा खरा प्रश्न आहे. कदाचित ,तू ही  बुचकाळयात पडला असेल.   बैलपोळा,तान्हा पोळा  संपला. पक्षांच्या इच्छूकांनी बक्षिसांची खैरात वाटली.आता गणेशोत्सवात घरोघरी जाण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.बक्षिसांची लयलूट होणार आहे.एकंदरीत काय ,मतदारां पर्यत जाण्याचा हा फंडा आहे. हे मतदारांना न समजण्या इतपत ते बालबच्चे नाहीत. मतदारही हुशार आहेत. ‘ देणा-याने देत जावे,घेणा-याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावे‘ अशी प्रचलित म्हण आता प्रत्यक्षात लागू होतांना दिसत आहे. बल्लारपूर विधानसभेसाठी कॉंग्रेसमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटिल मारकवार,डॉ.अभिलाषा गावतूरे, घनश्याम मुलचंदानी उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत.यांनी प्रबळ दावेदारी ठोकली आहे.पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाचा विचार करतात,हे गुलदस्त्यात आहे. तो पर्यंत सर्वांना कामाला लागा असा आदेश नक्कीच मिळाला असेल.त्यामुळे पक्षाचे इच्छूक आपआपल्या तयारीला लागले आहे.प्रकाश पाटिल मारकवार पदयात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवीत आहेत.संतोषसिंह रावत डोअर टू डोअर गाठीभेटीवर जोर देत आहेत.ग्रामीण भागात कार्यकर्ते भाऊंचा प्रचार करीत आहेत.आमचं ठरलय असे म्हणत जोश निर्माण करीत आहेत. घनश्याम मुलचंदानी यांचाही गाठीभेटीवर जोर आहे.डॉ.अभिलाषा गावतूरे मोर्चा, आंदोलनाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवीत आहेत. हे सर्व निवडणुका डोळयांसमोर ठेवून कार्य होत असले तरी,नक्की बाप्पा तू कोणाला पावणार हा खरा जनतेच्या मनातला प्रश्न आहे. जनतेचा आवाज बाप्पा,तुझया कानापर्यंर्त पोहचावा अशी इच्छा आहे.राज्यात महाविकास आघाडी आहे. शिवसेना उदधव ठाकरे गटाकडून संदीप गि-हे यांनीही प्रबळ इच्छा बोलून दाखविली आहे. त्यांनीही वेगवेगळया कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेत आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. परंतु बाप्पा , प्रबळ दावेदार कोण ? हे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतरच समजणार आहे.
भारतीय जनता पक्षा कडून विदयमान आ.ना.सुधीर मुनगंटीवार निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे.बाप्पा, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाऊंचे दौरे वाढले आहेत.प्रत्येक कार्यक्रमात भाऊंचा प्रत्यक्ष सहभाग वाढला आहे.लोकसभेतील पराजय पचवीत भाऊ नव्या जोमाने आणि हिरीरीने सक्रीय सहभाग नोंदवीत आहेत.त्यामुळे भाजपाचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या विरूदध मविआचा तगडा उमेदवार कोण ? ही जनतेची उत्सूकता शिगेला पोहचत आहे. बाप्पा , बल्लारपूर विधानसभा मतदार संघात जातीचे समिकरण चालणार की विकासाची दूरदृष्टी चालणार हे येणारे दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत जातीचे फॅक्टर चालले.तसेच विधानसभेत झाले ,तर लढत चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.तुर्तास, विधानसभचे वारे सर्वत्र घोंघावत आहेत.सगळयांना विधानसभेचे वेध लागले आहे.गुडघ्याला बाशिंग बांधून सगळेच आहेत. बाप्पा , दहा दिवसात सर्व स्पष्ट होवू दे रे बाप्पा….!!! एकदमही इच्छूक उमेदवाराले ताणू नकोस आणि मतदाराले सुदधा कोडयात ठेवू नकोस.. !! एकदाचे क्लिअर होवू दे. ज्यांची प्रबळ इच्छा आहे,त्यांना पक्षाची उमेदवारी मिळू दे. मागिल निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली,हे महत्वाचे नाही.आता नवीन काय बदल होणार हे महत्वाचे आहे.काय तो चमत्कार तुझ्याच हातात आहे रे बाप्पा…!!
तो पर्यंत तुझ्या नामाचा गजर करतो. गणपती बाप्पा मोरया… !!!!!
तुझा
जनतेचा आवाज
विनायक रेकलवार
मुख्य संपादक
&
दि. 11 सप्टेंबर 2024