अन्, त्या अफवेने वनविभागाची झाली धावपळ – संबधित गुराख्यास फुटले रडू

396
अन्, त्या अफवेने वनविभागाची झाली धावपळ
संबधित गुराख्यास फुटले रडू
मूल तालुका वाघाच्या दहशतीत
प्रादेशिक वनविभागातर्फे तीस ट्रप कॅमे-यांची निगराणी
बफर वनविभागातर्फे एआय सिस्टीम आणि 25 कॅमे-यांची निगराणी
मूल
 :- वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मूल तालुका दहशतीत सापडला आहे.मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.येथील शेतकरी,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये मोठे भितीचे वातावरण पसरले आहे.शनिवारी दुपारी प्रादेशिक वनविभागास निनावी फोन गेला.वाघाने ताडाळा येथिल गुराख्यास ठार केल्याचे सांगितले.त्यामुळे येथील वनविभागाची धावपळ झाली.वनविभागाची चमू घटनास्थळी पोहचली.त्याठिकाणी गुराखी गुरे राखत होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही घडले नव्हते. तो पर्यंत गावात खळबळ माजली होती. वनविभागाच्या कर्मचा-यांना बघताच संबधित गुराख्यास चांगलेच रडू फुटले. त्या गुराख्याच्या घरी सुदधा खळबळ माजली होती आणि रडारड सुरू झाली होती. गुराख्यास जीवंतपणीच मारल्याच्या अफवेने शनिवारी दिवसभर ताडाळा येथे एकच चर्चा रंगली होती. यामुळे वनविभागाची चांगलीच धावपळ झाली. संपूर्ण मूल तालुकाच वाघाच्या दहशतीत सापडला असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या वतीने वाघाच्या वाढत्या हल्ल्यांचा निषेध केला जात आहे.वनविभागास धारेवर धरल्या जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिण्यात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेलेला आहे.मागिल वर्षी सुदधा मूल तालुक्यात दहा ते पंधरा निष्पापांचा बळी गेलेला होता.
मूल तालुक्यातील दोन महिण्यातील वाघाच्या हल्ल्यातील घटना पुढील प्रमाणे आहे.
गणपत लक्ष्मण मराठे,रा.केळझर – 10-8-2024,
मुनीम रतीराम गोलावार रा.चिचाळा – 19-08-2024,
गुलाब हरी वेलमे,रा.जानाळा – 1 -09-2024,
वासूदेव झिंगरू पेंदोर, रा. मरेगाव – 03-09-2024,
देवाजी वारलू राऊत,रा.चिचोली – 19-09-2024 असे मृतांची नावे आहेत. तर,विनोद बोलीवार,रा.बोरचांदली – – 12-08-2024 रोजी जखमी झाले आहेत.

मूल तालुक्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे  बफर झोन,प्रादेशिक,सामाजिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल लाभले आहे.या चारही भागात वाघांचा मोठा संचार आहे. जंगलालगत बराचशा शेतशिवार असल्याने तसेच  जंगलाशेजारी जनावरांचे चराई क्षेत्र असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाकडून हल्ले होत आहे.त्यात निष्पाप शेतकरी,शेतमजूर आणि गुराख्यांचे बळी जात आहे. दरवर्षी मूल तालुक्याला वाघाच्या वाढत्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे.यावर शासन आणि  वनविभागातर्फे  विशेष उपाययोजना राबविल्या जात नसल्याने वाघाच्या हल्ल्यात बळी जाणा-यांची संख्या अधिक वाढली आहे. मूल तालुक्यातील मारोडा,सोमनाथ,करवन,काटवन,फुलझरी,डोणी,चिचोली,जानाळा,दहेगाव,चिचाळा,ताडाळा,बोरचांदली,राजगड,उथळपेठ, भादूर्णी,मोरवाही,चितेगाव,मरेगाव,अंतरगाव पारडवाही आणि मूल ही बफर आणि प्रादेशिक क्षेत्रातील गावे वाघाच्या दहशतीत आहेत.
प्रतिक्रिया :- ताडाळा येथील घटनेची माहिती मिळाल्यामुळे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.मात्र,प्रत्यक्षात तसे काहीही घडले नव्हते.आम्हाला पाहताच त्या गुराख्यास रडू फुटले.त्यांनतर अंतरगाव पारडवाही येथे वाघाने गाय मारली होती.त्याठिकाणी आम्हाला जावे लागले.वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी प्रादेशिक वनविभागातर्फे 30 कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. अशी माहिती मूल येथील क्षेत्र सहायक मस्के यांनी सांगितले.

ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे
वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आणि वाघाची हालचाल जाणण्यासाठी बफर आणि प्रादेशिक वनविभागातर्फे ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लागले आहेत. प्रादेशिक वनविभागातर्फे तीस ट्रप कॅमे-यांची निगराणी आहे.तर,
बफर वनविभागातर्फे एआय सिस्टीम आणि 25 कॅमे-यांची निगराणी सुरू आहे.