संपादकीय
एक पत्र वाघोबा साठी
एक पत्र वाघोबा साठी
बा… वाघोबा..
दंडवत प्रणाम.
मार्फत ,वनविभाग.
विषय :- मानव – वन्यजीव संघर्षाचा अध्याय थांबवा.
दंडवत प्रणाम.
मार्फत ,वनविभाग.
विषय :- मानव – वन्यजीव संघर्षाचा अध्याय थांबवा.
बरेच दिवस झाले. विचार करीत होतो.एक पत्र तुझ्या नावाने लिहावे. असे सारखे सारखे वाटत होते. आता वेळच तशी आली आणि पत्र लिहण्याचा प्रपंच हाती घेतला.त्याला कारणही तसेच आहे.आमच्या मूल तालुक्यात तुझा होत असलेला त्रास आता असहय झाला आहे.तुझी दहशत ऐवढी वाढली की,आम्हा शेतकरी,शेतमजूर आणि गुराखी बांधवाना तुझे नाव काढले ,तरी नुसता अंगाचा थरकाप होतो.अंगावर काटा येतो.
वाघोबा.., तू आमच्या चंद्रपूर जिल्हयाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा राजा. तुझी एक छबी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आम्ही भारतवासिय तर तुझे फॅन तर आहोत,परंतु,ज्यांना जंगलातील भ्रमंती आवडते ते तर तुझे मोठे फॅन आहेत.मोठ मोठे कॅमेरे धरून तू दिसलाच की तुझे वेगवेगळे फोटो काढण्यास व्यस्त होवून जातात.काहींनी तर तुझ्या परिवाराचे फोटो काढून बक्षिसे सुदधा जिंकली आहेत. आमचा मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर तुझा तर मोठा चाहता आहे. आपल्या परिवारा सोबत येवून तुझ्या परिवाराचे दर्शन करतो. पर्यटकांना अनेक वेळा तुझे मनसोक्त दर्शन झाले आहे. पर्यटकांच मन जिंकतो. तुझ्या साठी वेगवेगळे गेट उभे केले.
वाघोबा.., तू जंगलातच ठिक आहे.पण हल्ली तुझे वास्तव्य आमच्या गावाशेजारी,शेतशिवारात व्हायला लागले आहे. हे मोठे खटकणारे आहे. तू जंगलात खुश राहा.आम्हाला आमच्या गावात खुश राहू दे नां. आम्ही शेतात गेलो की हल्ला करतो,गुरे चारायला नेलो की हल्ला करतो, शेतीच्या कामाला गेलो की हल्ला करतो. या तुझ्या कृत्याला काय म्हणायचे. आम्ही शेती करू नये का ? आम्ही गुरे पाळावी नाही का ? आमच्या शेळया मेंढयांना चारा आणू नये का ?
अरे ,वाघोबा.., शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठया प्रमाणात शेती वर अवलंबून आहे. शेतक-यांनी ठरवलं की , आम्ही वाघोबाच्या भितीमुळे शेती करणार नाही.मग काय करशील. आम्हाला वनविभागाने बसल्या जागेवर सर्व मदत करावी ,आमच्या कुटुंबाचे पालनपोषण करावे.असे तुला वाटते काय ? देशाची अर्थव्यवस्था बिघडली,अन्नधान्याचा तुटवडा पडला ,तर आम्ही त्याला जबाबदार नाही. तु त्याला जबाबदार राहशील. बोल आता. आहे उत्तर तुझ्या कडे. गाय,बैल,म्हैस,शेळया,मेंढया आमचा कणा आहे. यातून दही,दूध,तूप लोणीचे उत्पन्न होते. हा आमचा पुरक व्यवसाय आहे. जनावरांना हिरवा चारा खुप आवश्यक आहे. पण,तुझ्या भितीपायी आम्ही करावे काय,असा प्रश्न पडला आहे.
वाघोबा..,तू आमच्या क्षेत्रात येवून आम्हाला सतावतोस आहे. तुझ्या मुळे आम्ही पुरते त्रस्त झालो आहोत. तुला आमची चटक लागली आहे का.जंगलातले भक्ष्यक कमी होत चालले आहेत का. तुझी संख्या वाढली का. किंवा तुझ्या नियत क्षेत्रावर तुझाच मोठा दादा अतिक्रमण करतो आहे का… ? याचे तरी उत्तर दे.आमच्या शेजारी येतोस.दबा धरून बसतोस आणि मग,आमच्या जनावरांवर हल्ला करतो. नाही तर, आमच्या बांधवांवर हल्ला करून ठार मारतोस. असे अजून किती बळी दयायचे आम्ही तुझ्यासाठी. आहे उत्तर तुझ्याकडे.
वाघोबा .., तुला जंगलात मनसोक्त फिरता यावे म्हणून , तुझे डिपार्टमेंट जंगलातील गावे उठवतात.दुसरीकडे गावे बसवतात.एकदाचे ते ही आम्ही मान्य करतो. परंतु हे सर्व करूनही तू आमच्या शेजारी येतच आहे ना. दरवर्षी तुझ्या हल्ल्यात शेकडो निष्पापांचा बळी जात आहे. त्यांचे कुटुंब वा-यावर सापडत आहे.संसार विस्कळीत होत आहे. घरचा कर्ता माणूस गेल्यावर कुटुंबाचे काय हाल होत असेल हे तुला नाही समजणार. तुला काय म्हणा… तुला वाचवण्यासाठी डिपार्टमेंट धडपड करते. आम्ही गेल्यावर आम्हाला पंचवीस लाख रूपये देते. वाघोबा,पैसाची किमंत नाही रे.पैसे आज आहे ,उदया नाही. पण आमची किती फरफट होते. हे तुला नाही कळणार. जंगलाशेजारी राहणा-या , ग्रामिण भागात राहणा-या गावक-यांचे जीवनमानच मुळात जंगलावर अवलंबून असते.लाकूड फाटा लागतो ,सरपण लागते,चारा लागतो आणि इतर बरेच काही लागते.हे सर्व आता आणायचे कुठून. आहे उत्तर तुझ्या कडे.असेल तर, प्रामाणिकपणे सांग. काल परवा मोरवाहीच्या जंगलातील एक इसम सांगत होता.सर,आमच्या गावात वाघाची मोठी दहशत आहे.शेतकरी शेतीवर जाण्यासाठी घाबरत आहेत. रानडुकरासह इतर वन्यप्राण्यांचा हैदोस आहे. शेतीच्या बांधावर शेतक-यांनी यंदा तुरीची लागवड केली नाही. वाघाच्या भितीपोटी धानाचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. धानाले पाणी कसे करावे हा मोठा प्रश्न आहे. आम्हाले तर मोठी चिंता सतावत आहे. हे एका गावातील एका शेतक-याचे मत असे होते. अशीच परिस्थिती तालुक्यात सर्वच ठिकाणी आहे. बोल आता. आहे उत्तर तुझ्या कडे. तू तर चांगला ऐटीत आहे. धुमाकूळ घालत आहेस. आता तर, दिवसा ढवळया दिसायला लागला आहेस. तू तुझ्या क्षेत्रात सुखी राहा.तुझ्या क्षेत्रात अनेक वन्यप्राणी भक्ष्यक म्हणून आहेत.ते तू सोडून दिलास आणि आम्हाला भक्ष्य बनवून राहिलास. तुला काही झाले तर,डिपार्टमेंट मोठी धावपळ करते.वरच्या स्तरावर विचार विनीमय होते. वाघ वाचवा म्हणून मोठा निर्णय घेते. आणि … वाघाच्या हल्ल्यात माणूस मेला तर…वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात माणूस मेला तर… होते का चर्चा,वरच्या स्तरावर.शासन आपले कर्तव्य निभावते. पंचनामा होतो. मदत केली जाते. सोपस्कार पार पाडले जातात. पुन्हा दुस-या दिवशी आम्ही वर्तमानपत्रात वाचतो,वाघाच्या हल्ल्यात ……….. ?
वाघोबा.. आम्ही तुझ्या विरोधात नाही.तू आमचा आवडता आहेस. आमच्या पर्यटकांचा चाहता आहेस. तुझ्या पर्यटनामुळे लाखो रूपयांचा महसूल मिळते.जगभरात देशाचे नाव होते.आमच्या जिल्हयाचे नाव होते. याचा आम्हाला मोठा आनंद आहे.पण,तुझ्या हल्ल्यात आमचा शेतकरी,गुराखी बळी जातो ना,तेव्हा आमचे उर भरून येते. तेव्हा आमच्या मनाला,कुटुंबाला काय वाटत असेल हे तुला कळणार नाही. तेवढा तू हृदयस्पर्शी नाहीस आणि संवेदनशिलही नाहीस. हिंस्त्र हा गूण तुझ्यात भरला असल्याने तेवढा साधा भोळाही नाहिस.पण,तुला आमची परिस्थिती कळावी म्हणून तुझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पत्र लिहण्याचा हा प्रपंच आहे. बरेच काही लिहावेसे वाटत आहे.परंतु तुला राग येईल.माझ्या लिहण्यावर डरकाळी फोडसील. म्हणून पूर्णविराम देतो आहे.
ता.क.
मानव वन्यजीव संघर्ष अध्याय आता थांबव. आमच्या बांधवांना जगू दे,तू पण सुरळीत,सुरक्षित आनंदात राहा.कालच बिबटयाने सात वर्षाच्या मुलाला उचलून नेले.त्याचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह सापडला. जिल्हयात आता असे किती हल्ले होणार हे सांगता येत नाही. काहीतरी ठोस उपाययोजना होऊ दे.आमचा शेतकरी,शेतमजूर आणि गुराखी बांधव,जनावरे जगू दे….!! वाढत्या हल्ल्यांमुळे आम्ही चिंतेत आहोत.
तुझा
जनतेचा आवाज
श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
8975140998