विकासाच्या बाबतीत भेजगाव ठरणार आदर्श गाव ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

18

विकासाच्या बाबतीत भेजगाव ठरणार आदर्श गाव

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

*चंद्रपूर, दि. 09: मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचली आहे. भेजगावमध्ये अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. भेजगाव, डोंगरहळदी, चिंचाळासारखी गावे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आदर्श व्हावीत या दृष्टीने कामे करण्यात येत आहे. लवकरच हे स्वप्न पूर्ण झालेले असेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*

भाजपा पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करतांना ते बोलत होते. ‘गावातील रस्ते, नाली, ग्रामपंचायत इमारत, विजेची व्यवस्था, स्मशानभूमी, सिंचन व्यवस्था, मनरेगामधून गोडाऊन बांधकाम, प्रशिक्षणासाठी सामाजिक सभागृह, वाचनालये तसेच जे शक्य आहे ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भेजगावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘भेजगावशी माझं प्रेमाचं नातं राहिलेलं आहे. जो शब्द दिला तो पूर्ण केला. विधानसभेमध्ये लोकांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष करीत आलो आहे. कष्टकरी शेतकऱ्याला धानाचा हेक्टरी 20 हजार रुपये बोनस मिळवून दिला. भविष्यात गावाची प्रगती व्हावी यासाठी उमा-अंधारी नदीवर बंधारे बांधण्याचा मानस आहे. पाईपलाईनच्या माध्यमातून आसोलामेंढा, गोसेखुर्दचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. चिंचाळा, पाचगावात पाण्याची पाईपलाईन देत सिंचनाची योजना पूर्ण केली. जेवढी कामे या परिसरात शिल्लक राहिली असेल, ती येत्या काळात प्राधान्याने पूर्ण करेल.’

*संपर्क अभियानातून सुटतील समस्या*
गाव संपर्क अभियान राबवून प्रत्येक गावात शासकीय योजना पोहोचविण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेण्यात येईल. भेजगावचा विकास हे ध्येय असून विकासाच्या बाबतीत भेजगाव हे महाराष्ट्रात मॉडेल व्हावे, यादृष्टीने काम करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसह सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.