विदयुत पुरवठा खंडीत केल्याने मूल तालुक्यात कृत्रिम पाणी टंचाई

68
विदयुत पुरवठा खंडीत केल्याने मूल तालुक्यात कृत्रिम पाणी टंचाई

दहा गावांचा पाणीपुरवठा ठप्प; महिलांची पाण्यासाठी भटकंती

मूल :—  तालुक्यातील नागरिकांना शुदध व स्वच्छ  पाणी मिळावे आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी  जिल्हा परिषदेने बोरचांदली व 19 गावांकरिता जीवन प्राधिकरणाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना  पंधरा वर्षांपूर्वी कार्यान्वित आणली. या योजनेला आता ग्रहण लागले आहे. जिल्हा परिषदेने महावितरणाचे लाखो रूपयाचे बिल  भरले नाही.त्यामुळे बोरचांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा  पाच दिवसांपासून  बंद आहे.मूल तालुक्यात यामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.  महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.दहा गावांचा पाणी पुरवठा खंडीत झाल्याने प्रशासनाविरूदध  गावक—यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.
पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्तीचे काम चंद्रपूर येथील कंत्राटदाराकडे आहे.या योजनेअंतर्गत बोरचांदली, फिस्कुटी, विरई, येरगाव, पिपरी दीक्षित, चकबेंबाळ, सितंळा, भेजगाव, येसगाव, कवडपेठ, आदी गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या योजनेच्या देखभाल दुरुस्ती करिता लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र कंत्राटदार या योजनेच्या देखभाल दुरुस्ती कडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद आणि कंत्राटदार यांच्या मध्ये योग्य समन्वय नसल्याने  या योजनेचा पाणीपुरवठा अनेकदा खंडीत झालेला आहे.प्रशासन आणि कंत्राटदाराच्या दुदैवामुळे दहा गावातील  महिलांना पिण्याच्या  पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दहाही गावात सध्या स्थितीत थेंबभरही पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
बोरचांदलीत पाईपलाईन लिकेज् असल्याने पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. विरईतही हिच परिस्थिती असल्याने पाणी समस्या गंभीर झाली आहे.
कवठीत दीड वर्षांपासून नळ येाजना बंद
सावली तालुक्यातील कवठी येथे दीड वर्षांपासून येथील नळ योजना बंद आहे. महावितरणाचे लाखो रूपयाचे बिल थकल्याने येथे हिच दुदैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील महिलांना गळणा—या  व्हॉलचा आधार घ्यावा लागत आहे.दीड वर्षांपासनू बंद असलेल्या पाणी पुरवठयाकडे जिल्हा परिषदेने साधी विचारपूसही केली नाही.कवठीत या योजनेला पर्याय म्हणून स्वतंत्र नळ योजना सुरू केली.त्या कामाचा शूभमुहूर्त् करण्यात आला.मात्र दोन तीन महिण्यांपासून योजनेचे काम बंद असल्याने कामाच्या विश्वासर्हताविषयी गावक—यांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ स्वतंत्र नळ योजनेच्या कामाला गती दयावी अशी मागणी कवठी येथील उपसरपंच राकेश घोटेकार यांनी केली आहे.
 मूल मध्येही वाढीव पाणी पुरवठा योजना फसली
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता  वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली.सातही दिवस चोविस तास पाणी मिळेल असे आश्वासन देण्यात आले.प्रत्यक्षात मात्र एका वेळेसही व्यवस्थित नळाचे पाणी मिळत नसल्याचे वाढीव पाणी पुरवठा योजना फसल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.