झाडीची कला जगभरात पोहोचावी – सोनाली कुलकर्णी

37
झाडीची कला जगभरात पोहोचावी – सोनाली कुलकर्णी
मूल :-  झाडीपट्टी च्या कलेला एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. ही कला देशभरातच नव्हे, तर जगभरात पोहोचावी असे मत मराठी चित्रपट सृष्टीच्या आघाडीच्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मूलमध्ये आयोजित झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव 2024 च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जेष्ठ नाट्य कलावंत पद्मश्री परशुराम खुणे हे संमेलनाध्यक्ष होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आले. मंचावर झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे, नाट्य लेखक सदानंद बोरकर, मुल नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर,माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, महेंद्र करकाडे , प्रशांत समर्थ, किशोर कापगते, प्रा.किरण कापगते आदी उपस्थित होते.
यानिमित्त गावातून लोककलादिंडी काढण्यात आली. त्यात सोनाली कुलकर्णी यांच्या सह झाडीपट्टी तील कलावंत, लोक कलावंत सहभागी झालेले होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, झाडीपट्टी सांस्कृतिक महा महोत्सव 2024 हे एक झाडीपट्टीच्या कलाकारांसाठी एक चांगले व्यासपीठ लाभलेले आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले पाहिजे. झाडीपट्टी च्या कलावंतांना  एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. झाडीपट्टी महोत्सव संपूर्ण राज्यभरात साजरा होईल. केवळ राज्यात आणि देशातच नव्हे तर ही कला संपूर्ण जगभरात पोहोचेल अशी अपेक्षा सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्यात झाडीपट्टीतील लोककलावंतांचा आणि झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सदानंद बोरकर यांनी केले. यावेळी नाट्य कलावंत आणि रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 या झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव कार्यक्रमांमध्ये झाडी पट्टी नाटक, दंडार, खडीगंमत, रेला नृत्य ,कीर्तन, भुलाबाईची गाणी, रोवण्याची गाणी, लावणी, महादेवाची गाणी ,दहाका इत्यादी पारंपारिक लोककलांची भरगच्च मेजवानी राहणार आहे. 18 तारखेला झाडीपट्टीचे नाटक लावणी भुलली अभंगाला हे नाटक सादर करण्यात आले. सोमवारी रेला नॄत्य, झाडीपट्टीतील गायकांचा सुगम संगीताचा कार्यक्रम तसेच झाडीपट्टीतील गाजलेले नाटक भूक सादर करण्यात आले. मंगळवार ला  झाडीपट्टी रंगभूमी – काल आज आणि उद्या तसेच समारोप कार्यक्रम होणार आहे.