मराठी भाषा गौरव दिन
कुसुमाग्रज यांचा जन्मदिन
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१४ रोजी घेण्यात आला.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.परंतु राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता नव्हती. हे शल्य वसंंतराव नाईक यांना होते. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारने ‘मराठी राजभाषा अधिनियम 1964’ सर्वप्रथम आणून 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे वसंंतराव नाईक सरकारने १ मे रोजी अधिकृतपणे जाहीर केले.1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करून प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली आणि राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. मराठी भाषागौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही दिवस भिन्न आहेत. मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी परिश्रम घेणारे प्रतिभावंत साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषागौरव दिवस म्हणून सन २०१३ पासून साजरा केला जातो.