मधमाश्यांच्या हल्ल्यात अंत्यसंस्कारातील अनेक नागरिक जखमी
बंदोबस्त करण्याची मागणी,भितीचे वातावरण
मूल :- मधमाश्यांच्या हल्ल्यात अंत्ययात्रेतील लोक जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.यात नव्वद टक्के लोक जखमी झाले.त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. मूल येथील अनिल राखडे याचे एका आजारामुळे निधन झाले.त्याची अंत्ययात्रा मूल येथील उमा नदीच्या घाटावर नेण्यात आली.मृतदेह नदीच्या पात्रात सरणावर जळत असताना पुलाच्या खाली असलेल्या मधमाश्यांनी अंत्ययात्रेतील सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला चढविला.अचानक पणे झालेल्या या हल्ल्यामुळे लोकांची पळापळ झाली.यातील नव्वद टक्के लोकांना मधमाश्या चावल्या.एकीकडे सरणावर मृतदेह जळत असताना दुसरीकडे जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात भरती करण्याचे काम सुरू होते.या घटनेमुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.सरणावरील धुव्व्यामुळे या मधमाश्या उडाल्या असा अंदाज व्यक्त केला जात आहे.जवळपास अंत्ययात्रेतील सर्वच लोकांना उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले.ब-याच जणांना हाता पायाला ,डोक्याला,चेह-याला,मानेवर,कानाला मधमाश्यांनी चावा घेतला.त्यांच्यावर तात्काळ उपचार करून मधमाश्यांचे काटे काढण्यात आले.वेळीच उपचार झाल्याने आता ब-याच नागरिकांची तब्येत ठिक असल्याचे समजते.त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.मधमाशा चावलेल्या बऱ्याच लोकांना हगवण उलटीचा मळमळ त्रास सुरू झाला.
मूल येथील स्मशानभूमीतील तसेच उमा नदीच्या पात्रातील पुलाच्या खाली असलेल्या मधमाश्यांच्या पोळयांचा नगर पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.अशा घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.मधमाश्यांच्या भितीमुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह न्यायचे कुठे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.याकडे नगर पालिका प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दयावे अशी मागणी जोर धरीत आहे.