हरियाल पक्ष्याला मिळाले जीवनदान , महाराष्ट्राचा राज्यपक्षी,उष्माघाताचा फटका

126
हरियाल पक्ष्याला मिळाले जीवनदान
महाराष्ट्राचा राज्यपक्षी,उष्माघाताचा फटका
मूल :-विनायक रेकलवार

येथे मरणासन्न अवस्थेत सापडलेल्या हरियाल पक्ष्याला जीवनदान मिळाले.पक्षीमित्र राहूल आगडे याने या पक्ष्यावर उपचार करून त्याचे जीव वाचविले. वाढत्या तापमानाचा पशुपक्ष्यांना फटका बसत आहे.प्रचंड उष्णतेमुळे पक्ष्यांचा जीव कासावीस होत आहे. उष्माघातामुळे पक्षी बाधीत होत आहे.पाण्यासाठी त्यांना पाणवठयाचा आसरा घ्यावा लागत आहे.मूल येथे भाग्यरेखा सभागृहाच्या परिसरात शनिवारी मेट्रो मेडिको या भागात हरियाल मरणासन्न अवस्थेत आढळून आला. पक्षीमित्र राहूल आगडे यांनी हरियाल पक्ष्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप छौंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले.प्रचंड उष्माघाताला हरियाल हा पक्षी बळी पडला होता. हरियालवर योग्य उपचार झाल्याने त्याने रविवारी सकाळीच आकाशात भरारी घेतली.राहूलच्या समयसुचकतेमुळे हरियाल पक्ष्याला जीवनदान मिळाले.अशीच घटना भेजगाव येथे दोन दिवसाआधी घडली.योग्य उपचारानंतर हरियाल टवटवीत झाला.

हरियाल हा कबुतर वंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे.याला हिरवा होला,हरोळी,यलो फुटेड ग्रीन पिजन किंवा पिवळया पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते.याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन  फोनिकॉप्टेरा असे आहे.
पक्ष्यांसाठी पाणपोई :- पक्षीमित्र राहूल आगडे याने आपल्या घरी पक्ष्यांसाठी पाणपोई उभारली आहे. प्रचंड उष्णतेमुळे पक्ष्यांच्या घश्याला कोरड पडते. ऊनाचा सरळ मारा ते सहन करू शकत नाही.त्यामुळे पक्षी उष्माघाताचे बळी पडतात.त्यामुळे राहूलने आपल्या घरीच टेरेसवर पक्ष्यांसाठी घरटे आणि पाणपोई उभारली आहे.  चिमणीसह वेगवेगळे पक्षी मातीच्या जलपात्रातील पाणी पिण्याचा आनंद घेतात.