पटांगणाच्या परिसरात वाघाने फोडली डरकाळी

38
पटांगणाच्या परिसरात वाघाने फोडली डरकाळी
वाघाचे दर्शन ,सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

मूल :- येथील चंद्रपूर मार्गावरील कर्मवीर महाविदयालयाच्या पटांगणाच्या परिसरात वाघाने डरकाळी फोडली.तसेच रेल्वे स्टेशनच्या परिसरात वाघाने अनेकांना दर्शनही दिले.त्यामुळे येथे सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणा-या नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सोशल मिडीयावर रेल्वे रूळ ओलांडून जात असलेल्या वाघाचा फोटो व्हायरल झाल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे. सतत दोन दिवसांपासून या परिसरात वाघाने अनेकांना दर्शन दिल्याचे बोलल्या जात आहे. याच वाघाची डरकाळी कर्मवीर महाविदयालयाच्या पटांगणावर सायंकाळच्या दरम्यान  िंफरणा-या नागरिकांनी एैकली. येथिल चंद्रपूर मार्गावरील जानाळा,डोणीचा परिसर डोंगरीचा परिसर, रेल्वे स्टेशन मार्ग , जुना सोमनाथ ,ताडाळा मार्गावरील महाबीज केंद्र तसेच उमा नदीचा परिसर हा वाघाचा नेहमीचा भटकंतीचा मार्ग असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.या मार्गावरून भटकंती साठी एका नवीन वाघाने आपला क्षेत्र बनविल्याचे सांगितल्या जाते. या मार्गावरील आधीच्या वाघाचे फिस्कुटीच्या परिसरात निधन झाले होते.त्यानंतर या नवीन वाघाने हा परिसर बनवून या क्षेत्रावर तो आपले अधिराज्य गाजवित असल्याचे एका वनविभागाच्या कर्मचा-याने सांगितले. या वाघाने आत्तापर्यत कोणतीही जीवीतहाणी केली नाही.तरीही नागरिकांनी सतर्तकता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत  आहे.याआधी मूल परिसरात चामोर्शी मार्गावर  राईस मीलच्या भागात बिबटयाने पाऊल ठेवले होते.बाजार समितीच्या परिसरात रानगव्याने शिरकाव केलेला होता. डोंगरीच्या परिसरात अस्वलीचे दर्शन नेहमीचे झाले आहे. हा परिसर वनव्याप्त असल्याने गावाशेजारी दिसणा-या वन्यप्राण्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मवीर महाविदयालयाच्या पटांगणाजवळचा परिसर आणि रेल्वे स्टेशन ते ताडाळा मार्गावरील परिसर  प्रादेशिक वनविभागाकडे येत असून डोंगरीच्या नंतरचा परिसर वनविकास महामंडळाकडे अखत्यारीतील आहे. चंद्रपूर मार्गावरील रोडच्या दुस-या बाजूचा परिसर बफर झोन मध्ये मोडत असल्याने वन्यप्राण्यांची भटकंती एका मार्गावरून दुस-या मार्गाकडे होताना दिसत असल्याचे आढळून येत आहे.
या मार्गावर फिरणे धोक्याचे  :- सकाळी आणि सायंकाळी बरेचसे नागरिक कर्मवीर महाविदयालयाच्या पटांगणावर फिरायला जातात.तसेच काही हौसी नागरिक,वृदध आणि तरूण वर्ग रेल्वे स्टेशन मार्गावरील जुना सोमनाथ आणि त्याही पलिकडे असलेल्या भागात फिरायला जातात.या भागात फिरायला जाणे आता धोक्याचे ठरू शकते. हा मार्ग वाघाच्या भटकंतीचा असल्याने वन्यप्राण्याच्या भटकंतीत अडथळा निर्माण होण्याची भिती वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.