बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तीन लाख 978 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

43
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तीन लाख 978 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
357 मतदान केंद्र , जेष्ठ मतदारांना पोस्टल मतदानाची सोय
मूल :- 72 – बल्लारपूर विधानसभा मतदार संघात तीन लाख 978 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. वयाचे 85 वर्षे पार केलेले वयोवृदध आणि चाळीस टक्केंच्या वर असलेले अपंग यांना यंदा प्रथमच घरून पोस्टल मतदानाची सोय करण्यात आली आहे. राजकीय पक्षांसह सर्वांनी आदर्श आचार संहितेचे काठेकोर पणे पालन करावे, अशी माहिती येथील उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी दिली. येथील प्रशासकीय भवनात घेतलेल्या  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची 19 एप्रिल रोजी निवडणूक होवू घातली आहे.त्याअनुषंगाने त्यांनी पत्रकार परिषदेत 72-बल्लारपूर विधानसभा मतदार क्षेत्रातील माहिती दिली.पुरूष मतदारांची संख्या एक लाख 53 हजार 956 असून स्त्री मतदारांची संख्या एक लाख 47 हजार 19 आहे.तसेच तृतीय पंथीयांची संख्या तीन आहे.एक हजार पुरूषांमागे 955 महिला मतदारांची संख्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वयाच्या 85 वर्षावरील जेष्ठ मतदारांची संख्या 2246 तर, अंपंग मतदारांची संख्या 1842 आहे.यंदा प्रथमच जेष्ठ मतदार आणि अपंग मतदारांना घरून पोस्टल मतदानाची सोय करण्यात आली आहे.अशा मतदारांनी या संधीचा फायदा घेऊन मतदान करावे.याआधी या मतदारांनी प्रशासनाकडे एक अर्ज सादर करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 100 टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाली असे युवा मतदारांची संख्या वाढली आहे. 4219 युवा मतदार प्रथमच आपला मतदानाची हक्क बजावतील अशी माहिती उपविभागीय अधिकारी मेश्राम यांनी दिली.निवडणूकी संदर्भात विविध साहित्याचे मुद्रण अथवा छपाई करीत असताना प्रशासनाची परवानगी घेवूनच मुद्रण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.लोकसभा निवडणुकीसाठी बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 1588 मतदान कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये झोनल अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी आणि मतदान कर्मचारी यांचा समावेश आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 357 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच चार मतदान केंद्र प्रस्तावित असल्याचे विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.यावेळी मूल येथील तहसिलदार मृदूला मोरे,नायब तहसिलदार यशवंत पवार,पोंभूर्णा येथील तहसिलदार शिवाजी कदम,आचारसंहिता प्रमुख तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण उपस्थित होते.