वर्ग अध्यापनात शिक्षकांनी नवीन ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करावा – गटशिक्षणाधिकारी कोनपत्तीवार

66
वर्ग अध्यापनात शिक्षकांनी नवीन ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करावा – गटशिक्षणाधिकारी कोनपत्तीवार
मूल :- वर्ग अध्यापनात शिक्षकांनी प्राप्त असलेल्या नवीन ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करून विदयार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत करावी असे प्रतिपादन सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संध्याताई कोनपत्तीवार यांनी केले.इयत्ता 9 वी ते 12 वीच्या शिक्षकांसाठी तीन दिवशीय  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृदधी प्रशिक्षण विश्वशांती विदयालय,सावली येथे पार पडले.त्यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. प्रमूख पाहूणे म्हणून मुख्याध्यापक रविंद्र कुडकावार हे होते.राष्टीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मुलभूत बदलांच्या केंद्रस्थानी आहे.त्यामुळे पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकांचे सक्षमीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास होणे आवश्यक आहे.त्यासाठी शिक्षक क्षमता वृदधी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी दीपप्रज्वलन आणि  सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. एकात्मिक दृष्टीकोनाच्या माध्यमातून विविध बारा विषयांचा समावेश यात करण्यात आल्याने हे प्रशिक्षण शिक्षकांच्या क्षमतेत वृदधी करेल असा आशावाद मुख्याध्यापक रविंद्र कुडकावार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलभक डॉ. धर्मा गावंडे यांनी केले. तीन दिवशीय शिक्षक क्षमता वृदधी प्रशिक्षणात डॉ.धर्मा गावंडे,प्रा.पुरूषोत्तम कन्नाके,सहा.शिक्षक दिलीप अगडे,प्रा.अशोक लांजेवार यांनी सुलभकाची भूमिका पार पाडली.कार्यक्रमाचे संचालन सावली पंचायत समितीतील गट साधन केंद्राचे विषय तज्ज्ञ भोयर यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात तीन दिवशीय प्रशिक्षणातील आपले अनुभव कथन करीत प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.यावेळी मुख्याध्यापक,कनिष्ठ महाविदयातील प्राध्यापक,माध्यमिक शाळेतील सहा.शिक्षक उपस्थित होते.