तालुका क्रीडा  संकुलातील तिसरा डोळा हरवला , प्रशासन आणि कंत्राटदाराचे दुर्लक्ष

77
तालुका क्रीडा  संकुलातील तिसरा डोळा हरवला
प्रशासन आणि कंत्राटदाराचे दुर्लक्ष
तीन वर्षांपासून वातानुकूलीत यंत्र आणि वॉटर कुलरची प्रतिक्षा
मूल :-

येथील तालुका क्रीडा संकुलातील तिसरा डोळा हरवला आहे.निधी मंजूर असूनही तीन वर्षापासून तिसरा डोळयाची प्रतिक्षा करावी लागत आहे. तिसरा डोळा अभावी येथील खेळाडूंच्या चोरीला जाणा-या सायकली शोधण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. प्रशासन आणि समितीच्या दुर्लक्षांमुळे तालुका क्रीडा संकूल मुलभूत सुविधे पासून वंचित झाला  आहे. वॉटर कुलर बसविण्यात आले  नाही. त्यामुळे खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.इनडोअर गेम हॉल मध्य दोन टनचे वातानुकलीत यंत्र सुदधा बसविण्यात आले नाही. प्रशासनाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाटयावर आला आहे.
क्रीडा क्षेत्रात तालुक्यातील विदयार्थ्यांनी,खेळाडूंनी बाजी मारावी.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरावी आणि  त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी चमकावे हा उददात्त हेतू डोळयांसमोर ठेवून मूल येथे तालुका क्रीडा संकूलाची उभारणी करण्यात आली. परंतु अधिकारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे खेळाडू घडण्याऐवजी त्यांना विविध समस्यांनाच सामोरे जावे लागत आहे. संकूल परिसरात अनेक मुलभूत सेवेचा अभाव असल्याने विदयार्थ्यांच्या सरावात मोठया अडचणी निर्माण होत आहे. पाच करोड रूपये खर्चून आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून सुसज्ज इनडोअर गेम हॉल बाध्ांण्यात आले.बॅडमिंटन आणि इतर खेळ खेळण्याची सुविधा यात आहे. विदयुत सुविधेचा प्रश्न मार्गी लागला. परंतु या हॉल मध्ये अजूनही वातानुकूलीत यंत्र बसविण्यात आले नाही. अंदाजपत्रकात मूलभूत सुविधांसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे.तरीही प्रश्न मार्गी का लागत नाही याविषयी अनेक शंका निर्माण होत आहेत.
सीसीटिव्ही कॅमेरा साठी वायर आणि खांबाची उभारणी करण्यात आली आहे.पंरतु या खांबाना सीसीटिव्हीची प्रतिक्षा लागली आहे.खांब उभारून तीन वर्षे पूर्ण झालीत परंतु तिसरा डोळा कुठे गायब झाला , हे कळायला मार्ग नाही.याविषयी अधिकारी बोलायला तयार नाही. तालुका क्रीडा संकूलाचा साडेपाच एकरचा परिसर आहे. यापूर्ण परिसरासाठी 46 सीसीटिव्ही कॅमेराची तरतूद करण्यात आली. परिसरात खांबाची उभारणी करण्यात आली.वायरींग करण्यात आली आहे. परंतु तीन वर्षानंतरही सीसीटिव्ही कॅमेरे आणि याचे इतर साहित्य संच लागलेच नाही. त्यामुळे येथील प्रशासनाला मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. खेळाडूंच्या सायकली आणि इतर सामान चोरीला जात असल्याने ते शोधणे मोठे जिकरीचे काम झाले आहे. येथे नियमित खेळाडू येतात. खेळाडूंचे प्रशिक्षण होतात. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुदधा येथे सोय नाही. थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी अशी तरतूद आहे. पंरतु दोनशे लिटरची क्षमता असलेले वॉटर कुलर सुदधा येथे उपलब्ध झाले नाही. इनडोअर गेम हॉल मध्ये दोन टन वातानूकुलीत यंत्र बसविण्याची तरतूद आहे.ते सुदधा कुठे गायब झाले. हा प्रश्नच निर्माण झाला आहे. हे साहित्य कंत्राटदाराने जिल्हा स्तरावर   वस्तू पुरविल्या, असे बोलल्या जाते. पण त्या कुठे गायब झाल्या. हे एक रहस्यमय कोडेच आहे. मूलच्या तालुका क्रीडा संकूलाला तीन वर्षांपासून या साहित्याची प्रतिक्षाच करावी लागत आहे.
याविषयी जिल्हा क्रीडा अधिकारी पुंड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया प्राप्त होवू शकली नाही.
प्रशासनाचे दुर्लक्ष :- तालुका क्रीडा संकूलाच्या योग्य कारभारासाठी तालुका क्रीडा संकूल समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीत जिल्हयाचे पालकमंत्री स्वतः अध्यक्ष असतात. तहसिलदार हे स्वतः कार्याध्यक्ष असतात.यात पोलिस निरिक्षक,गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांचा समावेश असतो.समिती मध्ये वरिष्ठ अधिका-यांचा भरणा असूनही तालुका क्रीडा संकूलाकडे होणारे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.
बातमी- विनायक रेकलवार, मूल
            मुख्य संपादक