व्यवसाय करतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी विनय गौडा
अनुज्ञप्ती परवानाधारकांसोबत जिल्हा प्रशासनाचा संवाद
चंद्रपूर : अनुज्ञप्तीचा परवाना देतांनाच शासनाने अटी व शर्तीसुध्दा घालून दिल्या आहेत. आपल्या व्यवसायामुळे इतरांना त्रास होईल, अशी कृती न करता परवानाधारकांनी नियमानुसारच वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, नियमांचे उल्लंघन किंवा अवैध व्यवसाय करणा-यांविरुध्द सक्त कारवाई करण्यात येईल, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात अनुज्ञप्ती परवानाधारकांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुरजकुमार रामोड उपस्थित होते.
अनुज्ञप्ती विक्री, वाहतूक व साठवणूक संदर्भात कायद्याचे पालन होणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कुठेही नियमांचे उल्लंघन आढळले तर कारवाईसाठी तुम्हीच जबाबदार रहाल. नियमांचे गांभिर्य समजावून सांगण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुकानदारांनी दर्शनी भागात कमाल, किरकोळ विक्री व वेळेबाबतचा फलक लावावा. तसेच नोकरनामा, आवश्यक अभिलेख, स्टॉक रजिस्टर अपडेट ठेवा. ज्या दिवशीचे रजिस्टर त्याच दिवशी भरून पूर्ण करा. जेणेकरून कोणत्याही वेळेस प्रशासनाकडून पडताळणी झाली तर अडचण होणार नाही.
अनुज्ञप्ती विक्री संदर्भात नियमानुसार दिलेल्या वेळा गांभिर्याने पाळा. ज्या परवानाधारकांकडे सीसीटीव्ही नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रात 21 वर्षांखालील नागरिकांना मद्यविक्री करता येत नाही. 21 ते 25 वयोगटातील नागरिकांना सौम्य मद्यविक्री तर 25 वर्षांवरील नागरिकांना सर्व प्रकारची मद्यविक्री करता येते. त्यामुळे खरेदीदाराच्या ओळखपत्रावरुन वयाची पडताळणी करूनच मद्य विक्री करा. अन्यथा विनाकारण एखादी घटना घडली तर त्यात तुम्हीसुध्दा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे गांभिर्याने लक्ष द्या. दुकानावर असलेल्या इतर कामगारांनासुध्दा सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अवैध व्यवसाय करणा-यांची माहिती प्रशासनाकडे द्या व स्वत:चा व्यवसाय नियमानुसार करा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले.
पैसे कमाविण्याच्या नादात कायद्याच्या कचाट्यात अडकू नका : एसपी सुदर्शन
अटी व शर्तीनुसारच अनुज्ञप्ती परवानाधारकांनी व्यवसाय करावा. अवैध व्यवसाय करणा-यांवर प्रशासनातर्फे नियमित कारवाई सुरूच आहे. याव्यतिरिक्त अवैध विक्रीबाबत काही माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला त्वरीत कळवा. नियमांचे उल्लंघन करून पैसे कमावण्याच्या नादात विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकू नका, असे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले.
ठरवून दिलेल्या नियमानुसार आपली दुकाने वेळेवर सुरु करा व वेळेवर बंद करा. ‘दारू पिऊन गाडी चालवू नये’ अशा आशयाचे फलक आपल्या दुकानांसमोर लावा. राज्यातील इतर घटनांची चंद्रपूरमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नियमांचे पालन करण्यासंदर्भात ही बैठक बोलाविण्यात आली आहे. असामाजिक तत्वांकडून त्रास होत असे, दारूकरीता कोणी जबरदस्ती करीत असेल तर पोलिस विभागाला कळवा किंवा 112 क्रमांकावर थेट कॉल करा, पोलिसांकडून नक्कीच कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. सुदर्शन यांनी दिली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. रामोड यांनी प्रास्ताविकातून नियमांबद्दल माहिती दिली. तसेच याप्रसंगी अनुज्ञप्ती परवानाधारकांनी सुध्दा आपले म्हणणे / सूचना प्रशासनाला सांगितल्या. बैठकीला जिल्ह्यातील परवानाधारक अनुज्ञप्ती व्यवसाय करणारे उपस्थित होते.