मोदी आवास घरकूल योजनेचा महिण्याभरापासून निधीच नाही , निधी अभावी घरकूल बांधकाम रखडले

57
मोदी आवास घरकूल योजनेचा महिण्याभरापासून निधीच नाही
निधी अभावी घरकूल बांधकाम रखडले
पावसाळयात लाभार्थ्यांची अडचण
मूल :-विनायक रेकलवार

राज्यशासन पुरस्कृत असलेल्या मोदी आवास घरकूल योजनेचा सन 2023-24 वर्षाचा निधी महिण्याभरापासून प्राप्तच झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.निधी अभावी घरकूल बांधकाम पूर्ण कसे करावे असा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे.मूल तालुक्यात मोदी आवास घरकूल योजनेचे 1174 लाभार्थी आहेत. या योजनेच्या संदर्भात, अख्या महाराष्ट्रभर हीच परिस्थीती असल्याचे बोलल्या जात आहे.
ग्रामिण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबाना घरकूल बांधकामासाठी शासनातर्फे अर्थसाहायय दिल्या जाते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड केली जाते.राज्यशासना मार्फत यशवंतराव मुक्त वसाहत योजना,मोदी आवास घरकूल योजना,शबरी आवास योजना,रमाई आवास योजना अशा वेगवेगळया घरकूलच्या योजना राबविल्या जातात.इतर योजनेचा निधी नियमित मिळत असल्याची माहिती आहे.परंतु, मोदी आवास घरकूल योजनेचा निधी मागिल एक महिण्यापासून मिळालाच  नसल्याचे लाभार्थी बोलत आहेत. निधी मिळावा यासाठी लाभार्थ्यांना येथील पंचायत समितीमध्ये वारंवार चकरा माराव्या लागत आहे.मूल तालुक्यात मोदी आवास घरकूल योजनेचे निधी अभावी मोदी आवास घरकूल योजनेचे बांधकाम रखडले गेल्याने लाभार्थ्यांसमोर प्रश्नचिन्हच निर्माण झाले  आहे. पहिला हप्ता मिळाला.मात्र दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला नसल्याने लाभार्थी आर्थीक अडचणीत सापडले आहे. पहिला हप्ता मिळाल्या नंतर लाभार्थ्यांनी जोथ्या पर्यंत बांधकाम केले आहे. पंचायत समितीच्या गृह निर्माण विभागाकडून सूचना मिळाल्यानंतर काही लाभार्थ्यांंनी स्लॅब पर्यंत बाधकाम केले आहे.दुसरा आणि तिसरा हप्त्याचा निधी अजूनपर्यंत प्राप्त न झाल्याने आता त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाचे दिवस असल्याने अर्धवट बांधकामामुळे लाभार्थ्यांंना वेगवेगळया समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.त्यांच्या निवा-याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. मोदी आवास घरकूल योजनेचा निधी तात्काळ मिळावा अशी मागणी तालुक्यातील लाभार्थ्यांकडून होत आहे.
कोट :- मोदी आवास घरकूल योजनेचा निधी मागिल एक महिण्यापासून मिळाला नाही.त्यामुळे निधी अभावी या योजनेतील लाभार्थ्यांचे घरकूल बांधकामे रखडले आहे.निधी राज्यशासनाकडूनच प्राप्त झाला  नाही. जसा निधी प्राप्त होईल तसा तो लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल. – श्री.रमेश मोहूर्ले,ग्रामिण गृहनिर्माण अभियंता,पंचायत समिती,मूल


मूल पंचायत समिती अंतर्गत

वेगवेगळया योजनेतील घरकूल लाभार्थ्यांची संख्या
1) मोदी आवास घरकूल योजना-वर्षै 2023-24 – लाभार्थी 1174
2) यशवंतराव मुक्त वसाहत योजना -वर्षै 2022-23 – लाभार्थी 1954
3) शबरी आवास  योजना- वर्षै 2023-24 – लाभार्थी 503
4) रमाई आवास योजना-वर्षै 2023-24 – लाभार्थी 151