मूल शहर अमली पदार्थाच्या विळख्यात

37
मूल शहर अमली पदार्थाच्या विळख्यात
प्रशासनाचे दुर्लक्ष , कारवाईची मागणी
मूल
 :- स्थानिक मूल शहरासह तालुका  अमली पदार्थाच्या विळख्यात सापडला आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.अमली  पदार्थाचे सेवन आणि विक्री करणा-यांविरूदध पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी येथील माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी केली आहे.
मूल शहरासह तालुक्यातील शालेय विदयार्थ्यांसह युवकामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. अमली पदार्थाचे सेवन करून गुंडागर्दीत वाढ झाली आहे. मूल येथील काटवण रोड,कोसंबी रोड,ताडाळा रोड,नवभारत विदयालयाचा परिसर ,कर्मवीर महाविदयालयाचा परिसर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात युवक आणि शाळकरी विदयार्थी चरस ,गांजा या सारख्या अमली पदार्थाचे सेवन करून नशेत झिंगताना आढळून येत असल्याचे समर्थ यांचे म्हणणे आहे. त्याच बरोबर अल्पवयीन आणि शालेय विदयार्थी फेविकाल्स,सोलेशन,व्हाईटनर या वस्तूंचा वापरही नशेसाठी करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमली पदार्थाच्या सेवनामुळे नशा करणा-यांना विविध आजारांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भिती त्यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.शहरात नशा आणणा-या या अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे हिट अॅन्ड रन सारख्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता समर्थ यांनी वर्तविली आहे. त्यामुळे अमली पदार्थाची विक्री आणि नशा करून िंझंगणा-यांविरूदध पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी केली आहे.याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरिक्षक यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले. अमली पदार्थाची विक्री करणा-यांच्या  विरोधात पोलिस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले
===================
तरूण पिढी,अल्पवयीन आणि शाळकरी विदयार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस व्यसनाधिनतेच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सुंगधित तंबाखू मिश्रित खर्रा संस्कृती वाढत चालली आहे. पानठेल्यांवरील युवकांची गर्दी चिंतेचा विषय बनला आहे. पुरूषांबरोबर महिलांमध्ये खर्रा खाण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे कॅन्सर रोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे चरस गांजा या अमली पदार्थाकडे युवावर्ग आकर्षित होत असल्याचे आढळून येत आहे.त्यामुळे नशा करणा-यांची संख्या मूल शहरात वाढत आहे.याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे का ?असा सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे. याला जबाबदार कोण? पोलिस प्रशासन,पालक की उत्पादक कंपनी ?