जिल्हा प्रशासन पोहचले पूरग्रस्तांच्या मदतीला

34

जिल्हा प्रशासन पोहचले पूरग्रस्तांच्या मदतीला

 

पूरपीडितांचे स्थानांतरण, निवास व भोजनाची व्यवस्था

 

चंद्रपूर :-  जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक घरांचे नुकसान झाले तर काही नागरिक पुरात अडकून पडले. या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी तसेच पूर पिडीतांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरीत केले. सर्व पूर पिडीतांची जिल्हा प्रशासामार्फत योग्य काळजी घेण्यात येत असून राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

भारतीय हवामान खात्याने दिनांक 20 व 21 जुलै 2024 दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांना सदरहु कालावधील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. 21 जुलै 2024 रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 740 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान तसेच शेताचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.

 

चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली गावामध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथील 50 नागरीकांचे स्थानांतरण जिल्हा परिषद शाळा, चिचपल्ली येथे करण्यात आले असून, अजयपूर साज्यामधील नंदगुर गावातील शेतात अडकलेले विलास कुमरे (60 वर्षे) व महिला संगिता विलास कुमरे (50 वर्षे) यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आलेले आहे. अंधारी नदीजवळ असलेल्या “रिव्हर व्हु हॉटेल” मधून भोला अग्रवाल (26 वर्षे) रा. झारखंड तसेच बाजुच्या शेतामध्ये अडकेलेले प्रकाश चांदेकर व कुटूंबातील इतर सदस्‍यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आलेले आहे.

 

याचबरोबर, चंद्रपूर – मुल रोडवरील अंधारी नदीजवळ असलेल्या “ताडोबा अंधारी हॉटेल” मधून 8 पर्यटक व कर्मचारी यांना पाण्याच्या वेढ्यातुन बचाव पथकाचे सहाय्याने सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले आहे. अजयपूर साज्यातील पिंपळखुट येथे असलेल्या “रेड अर्थ रिसॉर्ट” मधुन मुंबई येथील 2 पर्यटक व रिसोर्टमधील 3 कर्मचारी यांना बोटीच्या सहाय्याने जिल्हा व शोध बचाव आपती व्यवस्थापन पथकाने बचाव करुन सुरक्षित स्थळी पोहचविले आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरातील रेहमत नगर येथे पावसाचे पाणी शिरल्यामुळे 25 ते 30 नागरीकांना महात्मा ज्योतीबा फुले, महानगरपालिका शाळा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.

 

सर्व ठिकाणांवरून स्थानांतरीत करण्यात आलेल्या नागरीकांना जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य सेवा व जेवणाची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. सदर कार्यवाही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी बचाव पथकाचे सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण परिसराला भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

 

गत 24 तासात जिल्ह्यात झालेला पाऊस : गत 24 तासात चंद्रपूर तालुक्यात 135.8 मिमी. पाऊस, मूल 164 मिमी., गोंडपिपरी 30.5 मिमी., वरोरा 89 मिमी., भद्रावती 99.9 मिमी., चिमूर 74.7 मिमी., ब्रम्हपुरी 48.5 मिमी., नागभीड 51.6 मिमी., सिंदेवाही 143.4 मिमी., राजुरा 44 मिमी., कोरपना 46 मिमी., सावली 174.4 मिमी., बल्लारपूर 73.5 मिमी., पोंभुर्णा 114.8 मिमी., आणि जिवती तालुक्यात 34.1 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

 

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. तसेच पर्यटनासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी मदतीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 07172-250077 आणि 07172-272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही कळविण्यात आले आहे.

 

0000000