संपादकीय
सायकलचा कृतज्ञता सोहळा
डॉक्टर आणि सायकलचे अद्वितीय समिकरण
श्री.विनायक रेकलवार,मूल
8975140998
सायकलचा कृतज्ञता सोहळा
डॉक्टर आणि सायकलचे अद्वितीय समिकरण
डॉक्टर आणि सायकलचे अद्वितीय समिकरण हे शीर्षक वाचून थोडेसे आपल्याला नवलच वाटले असेल. तुम्ही म्हणाल,त्यात काय नवल.हे तर चांगलेच आहे. सायकल चालविणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तमच आहे.सायकल चालविण्याने आपल्या शरीराचा व्यायामही होतो. यात ऐवढे काय विशेष आहे. मित्रांनो,यात शंभर टक्के विशेष आहे. विशेष असे की,एखादा व्यक्ती आपल्या वस्तूचे प्रामुख्याने कौतूक करीत असेल, तर त्यात विशेष नाही तर काय..! आपल्या जीवाभावाच्या सोबतीचे आपण कौतूक करायलाच पाहिजे. कारण, ती वस्तू आपल्या जिव्हाळयाची असते. अडल्या नडल्याच्या ,गरजेच्या वेळी आपल्या कामी आलली असते. त्या वस्तूने आयुष्यभराच्या सुख दुःखात साथ दिली असते. वस्तूनाही मन असते,असे एका कवीने म्हटले आहे. योग्य पद्धतीने आपण तिला वागविले ,तर वस्तू सुखावतात. म्हणून, वस्तूं विषयी कृतज्ञता व्यक्त करा. आणि ते आपण केलेच पाहिजे. हे एक प्रकारे आपले कर्तव्यच आहे. अशाच एका वस्तू विषयी कृतज्ञता सोहळा मूल मध्ये रविवारी 28 जुलै 2024 रोजी रामलीला भवन मध्ये आयोजित आहे.ती वस्तू म्हणजे सायकल.सायकलचा कृतज्ञता सोहळा.ही सायकल साधी नाही.ही एका लोकसेवकाची ,प्रतिष्ठीत डॉक्टर साहेबांची आहे. त्या सोहळयाचे आपण साक्षिदार झालेच पाहिजे. डॉक्टरी आयुष्याच्या सुरूवाती पासूनच्या ते आज पर्यंतच्या काळात साथ देणा-या जीवनसाथी सारख्या सायकलचा हा कृतज्ञता सोहळा आहे. हा सोहळा आयोजित करणारे मूल येथील डॉक्टर आहेत,डॉ. राम दांडेकर उर्फ अण्णा. त्यांनी आपल्या सायकलला तेजस्वीनी हे नाव देऊन सायकलची तेजस्वीता प्रखर,तेज आणि अधिक स्पष्ट केली आहे. डॉ.राम दांडेकर यांनी या सोहळयासाठी स्वतः कृतज्ञता सोहळा या नावाची निमंत्रण पत्रिका काढली.त्यात त्यांनी म्हटले आहे,मी केलेला 75 वर्षाचा सायकल प्रवास पूर्ण झाला आहे.तसेच सायकल वरून केलेल्या वैद्यकीय सेवेस 65 वर्षे पूर्ण होत आहे.म्हणून हे एक अद्वितीय समिकरण आहे. एखादया वस्तूची काळजी आपण किती आणि कशी घ्यावी ,त्या वस्तूचा वापर आपण किती करावा याला मर्यादा असतात. पण,डॉ.राम दांडेकर अर्थात आमच्या काकाजींनी उर्फ अण्णांनी ती वस्तू जपली.सायकलवर प्रेम केले.जीवापाड प्रेम केले. जुने ते सोने म्हणतात ना, ते खरेच आहे.याची प्रचिती डॉ.राम दांडेकर यांच्या सायकलच्या कृतज्ञता सोहळयावरून लक्षात येते.एक प्रकारे हा सायकलचा वाढदिवस म्हणायला काही हरकत नाही. ही कौतूकाची थाप आहे. आपल्या जीवनमरणाच्या काळात अविरत आणि अविश्रांत,जीवनसाथी म्हणून पाठिशी कायम उभे राहणा-या सायकलचे आभार मानावेच तेवढे कमी आहे. ,हे डॉक्टरांनी हेरले. त्यांच्या लक्षात आले.म्हणून त्यांनी सायकलविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोहळा आयोजित करतात, हे एक मोठे अविस्मरणीय आहे.अभूतपूर्व आहे. हा जिव्हाळा त्यांनी जपला. ही एक आमच्या साठी नाविण्यपूर्ण पर्वणीच आहे. डॉ.राम दांडेकर आज 89 वर्षाचे आहेत. तरीही त्यांची तारूण्यकाठी ठणठणीत आहे. पायात चप्पल घालीत नाही.अनवाणी ते खेडे गावात फिरतात. डोळयांवर चष्मा लागला नाही. इतर कोणते आजार नाही. ज्या सायकल विषयी जे कृतज्ञता व्यक्त करतात,त्या सायकल वरून त्यांनी ग्रामिण भागात फिरून वैद्यकीय सेवा दिली. वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने ग्रामिण भाग सायकलवरून पिंजून काढला. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. 75 वर्षाचा सायकल प्रवास आणि सायकल वरून केलेला वैद्यकीय सेवेचा 65 वर्षाचा प्रवास ही साधी गोष्ट नाही. एखादया स्पर्धेतील सायकल पटूला लाजवेल असा त्यांचा लाजवाब सायकल प्रवास आहे. ऐन तारूण्याच्या काळापासून ते थेट हातात काठी येई पर्यंत त्यांनी उन्हाळा,पावसाळा,हिवाळा या तीनही ऋतूत सायकल वरून फिरून वैद्यकीय सेवा केली. किंबहुना,ते आजही करीत आहेत. या वयातही ते सायकल चालवितात. हे विशेष आहे. ‘जे का रंजले गांजले , त्यांसी म्हणे जो आपूले‘ हे ब्रीद त्यांनी अंगिकारले. सायकलच्या हंॅण्ंडलवर दोन्ही बाजूंनी औषधींनी भरलेल्या थैल्या लटकवून त्यांनी ग्रामिण भागात सेवा दिली. प्रसंगी मोफत उपचार केले. अनेकांसाठी ते देवदूत बनले.हे फार मोठे कार्य आहे. दांडेकर डॉक्टर या नावाने प्रचिती मिळाली.मूल तालुक्याच्या खेडे गावात लोकं त्यांची आतूरतेने वाट बघतात. ही त्यांना मिळालेली एक लोकसेवेची पावतीच म्हणावी लागेल. या लोकसेवकाला सर्वांमध्ये साथ लाभली ,त्या सायकलची.त्याच सायकलचा हा कृतज्ञता सोहळा.डॉक्टर साहेबांनी कोरोना काळात केलेली कामगिरी उत्तूंग व वाखाणण्याजोगी आहे. एकीकडे रूग्णांवर उपचार करताना डॉक्टर सोशल डिस्टन्स पाळायचे.पण दांडेकर साहेबांनी बिनधास्तपणे रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले.काळजी घेतली स्वतःची आणि रूग्णांची. जनतेचा आवाज ऐकला. जनांसाठी काम केले. ही वैद्यकीय सेवा त्यांनी यशस्वी करून दाखविली. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा‘ हे ब्रीद डॉ.राम दांडेकर सातत्याने पाळत आहेत.ते त्यांच्या जीवनसाथी असलेल्या सायकलच्या मदतीने. डॉ.राम दांडेकर यांच्या वर विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श ते आपल्या उभ्या आयुष्यात तंतोतत पाळत आहेत.किंबहुना आजीवन सुरू आहे. डॉक्टर साहेब आमच्या साठी प्रेरणास्त्रोत आहेत.ते ऊर्जेचे स्त्रोत आहेत.त्यांचे कार्य अफाट आणि गौरवास्पद आहे. अशा लोकसेवक, आदर्शवादी आणि सेवाव्रती डॉ.राम दांडेकर यांच्या कार्याला सलाम केले पाहिजे. त्यांना उत्तमरित्या साथ देणा-या अनमोल,तेजस्विनी सायकलचे कौतूकही केले पाहिजे.ही सायकल म्हणजे केवळ वस्तू नाही.ती त्यांची जीवनसाथी आहे. डॉ.राम दांडेकर यांच्या सेवाभावी कार्याची ती जीवंत साक्षीदार आहे. ही सायकल पुढेही सुरूळीत आणि सुरक्षित राहो अशी सदिच्छा..!!
श्री.विनायक रेकलवार,मूल
8975140998
