राईस मिलच्या कोंड्यांला आग
कोंडा व धानाचे नुकसान
मूल :- येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अमोल एंटरप्रायजेस कंपनीच्या राईस मीलच्या कोंड्यांला आग लागली. त्यात कोंडा आणि धानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. रात्री ३ वाजेच्या सुमारास राईस मील मधील कोंड्याला आग लागल्याचे बोलल्या जात आहे. मूल – गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी नारायण राईस मिलच्या बाजूला अमोल एंटर प्रायजेस कंपनीची राईस मिल आहे. अनेक वर्षापासून उत्कृष्ट तांदळाची निर्मिती येथे होते. राईस मिलला लागूनच कोंड्याचे शेड आहे. याच शेडला रात्रीला ३ वाजता सुमारास अचानक आग लागल्याने शेड मधील कोंडा व राईस मीलच्या गोडाऊन मध्ये असलेल्या धानाच्या पो त्यांना झळ पोहचली. यात लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे अमोल एंटर प्रायजेसचे संचालक अमोल बच्चुवार यांनी सांगितले. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने कोंड्यांला आणि धानाच्या पोत्यांना लागलेली आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.