संपादकीय
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे कडून काही अपेक्षा
चंद्रपर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार म्हणून कॉंग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे.लोकसभा क्षेत्र मोठे आहे.सहा विधानसभांचा यात अंतर्भाव आहे.प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील बारकाईने अभ्यास करून तेथिल प्रश्न सोडविणे मोठे जिकरीचे काम ठरणार आहे. कॉंग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांचे कडून जनतेच्या फार मोठया अपेक्षा आहेत. भाजपाच्या धुरंधर,दूरदृष्टीकोन आणि अभ्यासू नेते असलेले आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना ताईंनी पराभवाचा धक्का दिला. प्रतिभाताईंनी लोकसभा जिंकल्याने त्यांच्या कडून जनतेच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ,शेतमजूर आणि सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न,समस्या भरपूर आहेत. मूल तालुक्याला जंगलाचे मोठे क्षेत्र लाभले आहे.बराचशा भाग बफर झोन मध्ये आहे.बफर झोन,प्रादेशिक सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळाचा जंगलाचा भूभाग तालुक्यात आहे.या क्षेत्रातील मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी झालेला नाही.दिवसेंदिवस या संघर्षात वाढ होत आहे.बफर झोन भागात बरेचशे रहिवासी आदिवासी बहूल आहेत.त्यांचा उदरनिर्वाह जंगलावर अवलंबून आहे. बांबूचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या मूलभूत प्रश्नांचा भाग असेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शेतकरी वर्ग अधिक आहे.शेती हा कणा आहे.मुख्य व्यवसाय हा शेती आहे.शेती शिवाय तरणोपाय नाही . त्यामुळे त्यांना शेतीत जाणे भाग आहे.परंतु वन्यजीवांमुळे शेतीच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. एकीकडे वाघांची डरकाळी,तर दुसरीकडे रानडुकराची भिती.गावालगत आणि शेतीलगत वाघाचे आगमन होत असल्याने नाहक शेतकरी,शेतमजूर यांचे बळी जात आहे.जंगलात चराई साठी जाणा-या गुराखी वाघाच्या हल्ल्यात बळी जात आहे.रानडुकरामुळे आणि इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवा मुळे पिकांचे मोठे नुकसान होते.दरवर्षी शेतक-यांना पिकांचे नुकसान सहन करावे लागते.त्यावर शासनाकडून तोकडी मदत जाहीर केल्या जाते. या सर्वांवर उपाय योजना आखणे गरजेचे आहे.जल,जंगल आणि जमिन हे घटक केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत.त्यामुळे शेतक-यांसाठी लोकसभेत आवाज उठविणे गरजेचे आहे. मूल तालुक्यात सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. तालुक्यात मामा तलाव असले तरी उन्हाळयात या तलावांची मोठी दयनीय अवस्था असते.मूल तालुक्यात सिंचनाचे मोठे प्रकल्प नाही. गोसीखुर्द,आसोला मेंढा आणि हरणघाट उपसा जलसिंचनचे पाणी तालुक्याच्या अर्ध्या भागात पोहचत नाही. शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. हयुमन प्रकल्प रखडलेला आहे. सिंचनाअभावी हरीतक्रांतीचे स्वप्न अधुरे आहेत. सिंचनाच्या क्रांती साठी तालुक्यात मोठे प्रकल्पाची उभारणी करता येईल काय ? याही दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे.
गडचिरोली ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग 930 झालेला आहे.गडचिरोली ते मूल सिमेंट रस्ता दोन पदरी झाला.त्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत.परंतु,मूल ते चंद्रपूर महामार्गासाठी घोडे कुठे अडले ? ते शोधणे गरजेचे आहे. गडचिरोली ते चंद्रपूर हा महामार्ग मूल वरून गेलेला आहे. मूल ते चद्रपूर महामार्गावर अपघाताची शृखंला रोजचीच झाली आहे. या महामार्गावर होणा-या भिषण अपघातात कित्येकांचा नाहक जीव जात आहे.त्यामुळे मूल ते चंद्रपूर महामार्ग चार पदरी होणे गरजेचे आहे.यातील अडथळा दूर करणे आवश्यक आहे.बफर आणि नॉन बफरचा भाग या महामार्गाला लागून असल्याने वन्यजीवांचा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.परंतु,मानवाचा जीव सुदधा तेवढाच महत्वाचा आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न आपण सोडवावा अशी अपेक्षा आहे. मूल ते चंद्रपूर हा महामार्ग चार पदरी होण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत.हे वरिष्ठ अधिका-यांची बैठक बोलावून यावर तोडगा काढावा अशी सामान्य जनतेची आणि तमाम प्रवाश्यांची अपेक्षा आहे.
मूल तालुका भात पीकासाठी प्रसिदध आहे.धान उत्पादक क्षेत्र आहे.येथे राईस मील अधिक प्रमाणात आहे.तांदूळ व्यवसाया व्यतिरिक्त इतर उदयोग तालुक्यात नाही.त्यामुळे राईस मील व्यतिरिक्त यावर आधारीत इतर उदयोगाची उभारणी तालुक्यात करता येणे शक्य आहे.त्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तालुक्यातील प्रश्न,समस्या अधिक आहे.आपण कार्यक्रमानिमित्त, सत्कारा निमित्त मूल मध्ये येत आहात. या प्रश्नांवर विचार मंथन झाल्यास अधिक बरे होईल. जनतेचा आवाज आपल्या पर्यंत पोहचल्यास या विचारांचे सार्थक होईल.
तालुक्यातील प्रश्न,समस्या अधिक आहे.आपण कार्यक्रमानिमित्त, सत्कारा निमित्त मूल मध्ये येत आहात. या प्रश्नांवर विचार मंथन झाल्यास अधिक बरे होईल. जनतेचा आवाज आपल्या पर्यंत पोहचल्यास या विचारांचे सार्थक होईल.
श्री.विनायक रेकलवार
8975140998