वाघाच्या हल्ल्यात शेळीपालन कर्ता ठार – मूल येथील घटना – एकाच महिण्यात दोन बळी,एक जखमी

19
वाघाच्या हल्ल्यात शेळीपालन कर्ता ठार
मूल येथील घटना,एकाच महिण्यात दोन बळी,एक जखमी
मूल
 :- बेपत्ता झालेल्या एका शेळीचा शोध घेणा-या शेळी पालन कर्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून  जागीच ठार केले. ही घटना संरक्षित वन क्षेत्राच्या कम्पार्टमेंट नंबर 752 मध्ये रविवारी घडली. सोमवारी सकाळी शेळीपालन कर्त्याचा मृतदेह मूल जवळील महाबीज केंद्राच्या मागे सापडला. मुनीम रतीराम गोलावार ,वय 41 ,रा.चिचाळा असे मृतकाचे नाव आहे.    मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागातर्फे तातडीची 50 हजार रूपयांची मदत करण्यात आली. मूल जवळच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.तथा शेतकरी,शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मूल तालुक्यातील चिचाळा येथील मुनीम रतिराम गोलावार हे नेहमी प्रमाणे 25 शेळया सोबत घेवून  शेळी चाराईसाठी बाहेर पडले.जंगलाच्या परिसरात शेळया घेवून फिरता फिरता ते ताडाळा मार्गावरील महाबीज केंद्राच्या परिसरात पोहचले.हा भाग संरक्षित वन क्षेत्रा अंतर्गत मोडतो. दुपारच्या सुमारास घराकडे परतण्याच्या वेळेस त्यांना एक शेळी कमी आढळली. त्यामुळे मुनीम एका शेळीचा शोध घेत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने मुनीम वर हल्ला करून जागीच ठार केले. बिथरलेल्या 24 शेळयांनी महाबीज केंद्राच्या जवळून ताडाळा मार्गे चिचाळा येथे जाण्यासाठी घरचा रस्ता पकडला.सायंकाळी शेळया मुनीम च्या घरी बरोबर पोहचल्या.कुटुंबीयांना एक शेळी कमी आढळली आणि मुनीम सुदधा घरी पोहचला नाही. अघटीत घटना घडली असावी या शंकेने कुटुंबीयानी वनविभागाला माहिती दिली.रविवारी रात्री 11 वाजे पर्यंत वनविभागाचे कर्मचारी आणि संजिवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी शोध मोहीम राबविली.सोमवारी सकाळी मूलचे क्षेत्रसहायक मस्के,वनरक्षक सुधीर ठाकूर,पवन येसाम्बरे,शितल चौधरी,शुभांगी गुरनूले,अतीशिघ्र कृती दल चंद्रपूरचे कर्मचारी,संजीवन र्प्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे,प्रशांत मुत्यारपवार,दिनेश खेवले यांनी परत शोध मोहीम राबविली असता कम्पार्टमेंट नंबर  752 च्या जंगलात त्यांचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला.वाघाने शेळी पालन कर्त्याचे चांगलेच लचके तोडले होते. मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल. वनविभागातर्फे आणि पोलिस प्रशासनातर्फे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतकाच्या पत्नीला वनविभागातर्फे चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांच्या हस्ते तातडीची 50 हजार रूपयांची मदत करण्यात आली. यावेळी केळझरचे क्षेत्र सहायक  पि.डब्लू.पडवे , महादवाडीचे क्षेत्र सहायक पि.डी.खनके, संजिवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे,जानाळा येथिल वनरक्षक आर.जे.गुरनूले आणि मृतकाचे नातेवाईक उपस्थित होते.मृतकास पत्नी,दोन मूले,आई असा परिवार आहे.
एकाच महिण्यात दोन बळी :- वाघाच्या हल्ल्यांमुळे मूल तालुका हादरला आहे.एकाच ऑगस्ट महिण्यात आत्तापर्यंत दोन बळी गेले.केळझर येथिल गुराखी गणपत लक्ष्मण मराठे कम्पार्टमेंट नंबर 431 मध्ये वाघाच्या हल्ल्यात ठार झाला.दुसरी घटना बोरचांदली येथे कम्पार्टमेंट नंबर 1800 मध्ये घडली.त्यात बोरचांदली येथिल गुराखी विनोद भाउजी बोलीवार वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.मूल मधील ही तिसरी घटना आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी ,शेतमजूर आणि गावक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील मानव वन्यजीव संघर्ष नित्याचीच बाब ठरली आहे.गावानजीक वन्यप्राण्यांचा शिरकाव होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.