वाघाच्या हल्ल्यात जानाळा येथिल गुराखी ठार

103
वाघाच्या हल्ल्यात जानाळा येथिल गुराखी ठार
डोणी  मार्गावरील घटना,वाढत्या हल्ल्यांमुळे चिंता
मूल :-जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून जागीच ठार केले.ही घटना बफर झोनच्या  कम्पार्टमेंट नंबर 353 मध्ये  रविवारी दुपारी डोणी मार्गावर  घडली. मृतक गुराख्याचे नाव गुलाब हरी वेळमे असे आहे.तो 52 वर्षाचा असून जानाळा येथिल रहिवासी आहे.जानाळा येथिल पाच सहा गुराखी नेहमी प्रमाणे गावातील आपआपली जनावरे घेवून  चराई साठी जानाळा आणि डोणीच्या जंगलात आली. जनावरे चरत असताना दुपारच्या दोन वाजताच्या सुमारास त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने गुलाब हरी वेळमे यांच्यावर झडप घालून त्यांना जागीच ठार केले.या अचानक झालेल्या घटनेमुळे जनावरे बिथरली.तसेच  इतर गुराख्यांनी गावाकडे धाव घेवून वनविभागाला माहिती दिली. मूल ते चंद्रपूर मार्गावरील डोणी फाटयावरील एक ते दीड किमी अंतरावर रस्त्यालगत ही घटना घडली.या घटनेने गुराख्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.नेहमी प्रमाणे गुराख्यांनी आपआपली जनावरे चराईसाठी जंगलात आणली होती. हा परिसर बफर झोन क्षेत्रामध्ये कम्पार्टमेंट नंबर 353 मध्ये येतो. मृतक गुराख्याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. घटनास्थळी बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. वनरक्षक मुकेश पांडव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
वाघाच्या वाढत्या हल्ल्याने चिंता :- मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त केल्या जात आहे.ऑगस्ट महिण्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला.तर बोरचांदली येथे एक जखमी झाला. वाढत्या हल्ल्यामुळे शेतकर,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.मूल तालुक्याला बफर,प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाच्या जंगलाचा मोठा भाग लाभला आहे.तिनही क्षेत्रामध्ये वाघांचा मोठा संचार आहे.त्याहीपेक्षा  बफर क्षेत्रामध्ये वाघांचा अधिक संचार आहे. वाघांची संख्या वाढत असल्याने  शेती करायची कशी आणि पाळीव जनावरे चराईसाठी न्यायची कुठे असा यक्षप्रश्न शेतक-यांपुढे उभा ठाकला आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे चराईचा प्रश्न गंभीर ठरू पाहत आहे. गुराख्यांच्या मृत्यू मुळे जानाळा येथे पोळा सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.