अंगावर घराची भिंत कोसळल्याने पती पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू

180
अंगावर घराची भिंत कोसळल्याने पती पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू
फिस्कुटी येथील घटना,गावात हळहळ
मूल :- जीर्ण झालेली घराची भिंत अंगावर पडल्याने पती पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.ही घटना तालुक्यातील फिस्कुटी येथे शनिवारी घडली.या घटनेने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.मृतक पतीचे नाव अशोक मोहूर्ले , वय 56 आणि पत्नीचे नाव लता अशोक मोहूर्ले वय 45 असे आहे.शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस येत असल्याने  मोहूर्ले दाम्पत्य शेतातून घरी आले. भजे खायची इच्छा झाल्याने पती नुकताच  बाजारातून मिरच्या घेऊन आलेला होता.पत्नी लताने चुली वर कढई मांडून तेल गरम करायला ठेवले होते.त्याच दरम्यान बाजूच्या घराची जीर्ण झालेली भिंत यांच्या कवेलूच्या घरावर कोसळली.त्यामुळे दोन्ही भिंती मोहूर्ले दाम्पत्याच्या अंगावर कोसळल्या.त्यात दोघेही दबल्या गेले.तसेच  गरम तेल सुदधा लता मोहूर्ले यांच्या अंगावर उधळले.दोन्ही भिंतीच्या दाबाने दाम्पत्य गंभीर जखमी झाले.आरडाओरड झाल्याने गावक-यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.दोघांनाही मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले.मूल येथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना  पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना पतीचा वाटेतच मृत्यू झाल. त्यानंतर अति रक्तस्त्राव झाल्याने पत्नीचा रात्री उशिरा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दोघांच्याही मृतदेहाचे चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. दोघांच्याही पार्थिवावर फिस्कुटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.जीर्ण झालेली भिंत तययूद खान पठाण यांच्या घराची होती.दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे. अशोक मोहूर्ले यांना दोन मुली होत्या. दोन्ही मुलींचे लग्न झाले होते.घरी हे दोघेच राहत होते. शेती हा त्यांचा व्यवसाय होता. या प्रकरणी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मूल पोलिस,तलाठी गजभिये आणि येथील सरपंच नितीन गुरनूले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.