वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
मरेगाव येथील घटना ,दोन महिण्यात पाचवा बळी
मूल :- आपल्या स्वतःच्या घरची चार पाच गुरे चराईसाठी घेवून गेलेल्या शेतक-यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.ही घटना तालुक्यातील मरेगाव आणि चितेगावच्या हददीत दुपारी 1 वाजताच्या सुमारास तान्हा पोळयाच्या दिवशी घडली. मृतक शेतक-याचे नाव वासूदेव झिगरू पेंदोर असे आहे. 60 वर्षीय शेतकरी मरेगाव येथिल रहिवासी होते.जानाळा येथिल घटनेनंतर हा सलग दुसरा बळी ठरला. मूल तालुक्यात दोन महिण्यात आत्तापर्यत वाघाच्या हल्ल्यात पाच बळी गेले. वासूदेव झिंगरू पेंदोर हे गावाजवळील नाल्याजवळ आपल्या स्वतःच्या घरची चार पाच गुरे चराई साठी सकाळी घेवून गेले होते.शेतीचे कामे आटोपल्यानंतर वासूदेव स्वतः आपल्या घरची गुरे चरायला नेत होता.नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी गावाशेजारील नाल्याजवळ गेलेला होता. चितेगाव हददीतील गुरूदास वाकडे यांच्या स्व मालकीच्या असलेल्या पडीत शेत जमिनीमध्ये गुरे चरत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पेंदोर यांच्यावर हल्ला चढविला. त्यात त्यांना जागीच ठार केले.वाघाच्या हल्ल्याने जनावरे बिथरली.त्यामुळे त्याच परिसरात जनावरे चराईसाठी घेवून आलेले गावातील मारोती पेंदोर आणि करणशहा पेंदोर यांना घटना माहित झाली. त्यांनी तात्काळ फोन करून मरेगाव येथिल पोलिस पाटिल पुंडलिक जवादे यांना घटनेची माहिती दिली.पोलिस पाटिल आणि ग्रामस्थ मिळून घटनास्थळ गाठले. पडीत शेतजमिन मध्ये पेंदोर यांचा मृतदेह आढळून आला. नियत क्षेत्र चितेगाव मधील ही घटना सावली वनविभागातंर्गत येत असल्याने पोलिस पाटिल यांनी सावली वनविभागाला आणि मूल पोलिसांना माहिती दिली. वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्र सहायक वाकडोत,वनरक्षक आर.व्ही.धनविजय,वनरक्षक गुरनूले,आखाडे,बोनलवार,नागोसे यांनी
घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेहावर मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सावली वनविभागातर्फे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांच्या हस्ते मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ 25 हजार रूपयांची मदत करण्यात आली.यावेळी संदीप कारमवार,उमेशसिंह झिरे,पोलिस पाटील पुंडलिक जवादे उपस्थित होते.
दोन महिण्यात पाचवा बळी :-
दोन दिवसाआधी तालुक्यातील जानाळा येथील गुराखी डोनी येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच सलग दुसरा हल्ला मरेगावच्या शेतक-यावर झाला. मूल तालुक्यातील हा दोन महिण्यातील पाचवा बळी ठरला आहे.ऑगस्ट महिण्यात तीन आणि सप्टेंबर महिण्यात आत्तापर्यंत दोन बळी गेले. वाघाच्या वाढत्या हल्यामुळे तालुक्यातील मानव – वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे. यामुळे शेतकरी,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.गावाशेजारी वाघाचे हल्ले वाढत असल्याने गावक-यांमध्ये भितीचे वातावरण आहे.आमची जनावरे चराईसाठी न्यायची कुठे असा यक्ष प्रश्न शेतकरी आणि गुराख्यांना पडला आहे.मूल तालुक्याच्या सभोवताल घनदाट जंगल असल्याने येथे वाघ ,बिबट यांच्यासह इतर वन्यजीवांचा मोठा संचार आहे. जंगलाशेजारी शेती कसताना आणि जंगलात जनावरे चरायला नेताना आपला जीव मुठीत घेवून शेतक-यांना वावरावे लागत आहे.गावाशेजारील वाघांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावी अशी मागणी जारे धरीत आहे.
ऐन पोळयाच्या दिवशी ही घटना घडल्याने मरेगावात शोक व्यक्त केल्या जात आहे.गावातील तान्हा पोळयाच्या उत्साहावर विरजण पडले.
मरेगाव येथे उन्हाळयात वाघाने तीन जनावरांना ठार केले होते. विलास उईके यांची गाय मारली होती.तर मुर्लीधर वाकूडकर यांच्या दोन म्हशीवर हल्ला करून ठार केले होते.तर इतर जनावरांना जखमी केले होते. आठ दिवसाआधी सतत तीन दिवस पिल्ला सहित वाघीणीने मरेगाव औद्योगिक विकास क्षेत्रात गावक-यांना दर्शन दिल्याचे पोलिस पाटिल जवादे यांनी सांगितले.उन्हाळयात चक्क गावातून वाघाने आपली भ्रमंती केलेला होता असे जवादे म्हणाले.मूल पासून सात आठ किमी अंतरावरच असलेल्या ठिकाणी सलग दोन घटना घडल्या.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.