रॉयल बार बंदीसाठी पारडी वासियांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर
मूल :- सावली तालुक्यातील पारडी येथे हरणघाट मार्गावर ग्रामपंचायतीच्या विना परवानगीने रॉयल बार अँड रेस्टॉरंट सुरू आहे. ती बार बंद करण्यात यावी, या मागणीसाठी पारडी वासीय शेकडो महिला व पुरुषांनी चंद्रपूर येथे धडक दिली. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.यावेळी बार बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सावली तालुक्यातील पारडी येथे महिलांच्या पुढाकारात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. पारडी ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही देशी किंवा विदेशी दारू दुकान नव्हते. 2022 मध्ये ग्रामपंचायत ने नवीन बारसाठी आलेले अर्ज नाकारून नाहरकत दिले नाही. मात्र उत्पादन शुल्क विभागाने यांचा विचार न करता परवाना देऊन बार सुरु केले. याबाबत गावाकऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. विभागाने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन तक्रारदारांच्या सह्यांची शहानिशा केली. मात्र त्यानंतर काहीच कारवाई झाली नाही. ग्राम पंचायत ची परवानगी नसतानाही बार सुरू झाले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. शेवटी त्यांना एकत्र येऊन एल्गार पुकारावा लागला. येथील शेकडो महिला पुरुष चंद्रपुरात पोहचले. अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचेशी शिष्टमंडळाने चर्चा केली. पोलीस अधिक्षक यांनी सावलीचे पोलीस निरीक्षक यांचेसोबत फोनवरून पारडी गावाकडे विशेष लक्ष देण्यास सूचना केली.
यावेळी गावकऱ्यांचे नेतृत्व पारडीचे उपसरपंच पारस नागापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष रवी गेडेकर, माजी सभापती छाया शेंडे, दारूबंदी अध्यक्ष सोनी नरुले, ग्रामपंचायत सदस्य नीता नरुले, ताराचंद नायबनकर, सुनील चौधरी, गणेश नरुले, अतुल नागापुरे, हेमचंद वाघरे, मंदाबाई गेडेकर, विमलबाई जराते, माधुरी जराते यांनी केले. यावेळी शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते.