मूल तालुक्यात रेतीचे अवैद्य उत्खनन

44

मूल तालुक्यात रेतीचे अवैद्य उत्खनन

स्थानिक नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष

मूल:-

तालुक्यातील हळदी, विरई, मरेगाव, मोरवाई, चितेगाव,केळझर, मूल येथील रेती घाटातून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीचे उत्खनन होत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन मात्र चुप्पी साधून आहे. तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रेतीचे अवैद्य उत्खनन करणे यावर बंदी आहे. मात्र,कोणत्याही प्रकारे अवैध्य उत्खनना विरुद्ध प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. तालुक्यातील हळदी, विरई, मूल, चितेगाव , मोरवाई नदी घाटातून गावालगतच असलेल्या ट्रॅक्टर चालकांनी काही रेती तस्करांना सोबत घेऊन उमा नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून, साठवणूक करून विक्री करीत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रात्री होत असलेल्या अवैध वाहतुकीने आणि वाहनांचे आवाजाने स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासन फक्त बघ्यांची भूमिका बजावित असल्याचा आरोप होत आहे.

अवैद्य रेतीचे उत्खनन, वाहतुकीवर प्रतिबंध घालून रेती तस्करांवर कठोर कारवाई करावी अशी विनंती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.
पाऊस थांबल्याने स्थानिक मूल मध्ये बैल बंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती ची वाहतूक करून विक्री सुरू आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतानाही प्रशासन हातावर हात ठेवून आहेत. रेती तस्कर आणि प्रशासन यांच्यात साटेलोटे असल्याची शंका गावकऱ्यांनी वर्तवली आहे. तालुका प्रशासन अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळते की बघ्याची भूमिका बजावते याकडे त्रस्त असलेल्या गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.