संपादकीय – एक पत्र भाऊंसाठी – भाऊ , जिल्हा परिषदेची ‘ ही ‘ मराठी शाळा वाचवा

446
संपादकीय
एक पत्र भाऊंसाठी
आद.सुधीर भाऊ,
सप्रेम नमस्कार.

विषय:– भाऊ ,मूल येथील गांधी चौकातील जिल्हा परिषद शाळेला एकदा तरी भेट दया. मराठी शाळा वाचवा.
भाऊ, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण तीन दिवस मूल मध्ये आहात.ही अतिशय गौरवाची आणि आनंदाची बाब आहे.बल्लारपूर विधानसभा मतदार संघ आपले कार्यक्षेत्र आहे.या क्षेत्रातील मूल हे अतिशय राजकीय दृष्टया संवेदनशिल असे गाव.या गावाने आपल्याला प्रतिनिधीत्वाची संधी दिली.या संधीचे आपण सोने करीत आहात. यात तिळ मात्रही शंका नाही.मूलचाच नव्हे तर, विधानसभा क्षेत्राचा आपण  चेहरामोहरा बदलविला. विविध विकासात्मक कामे झाली. भाऊ, या गावाने राज्याला स्व.मा.सा.कन्नमवार आणि श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने  दोन मुख्यमंत्री दिले. देवेंद्र फडणवीस आजही उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळीत आहेत.हे आमच्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे.आम्ही अभिमानाने सांगतो ,मूलने राज्याला दोन दोन मुख्यमंत्री दिले.  दलितमित्र माजी खा. स्व.वि.तू.नागापूरे आणि  माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची ही कर्मभूमी. एकेकाळी राज्याच्या राजकारणाची सुत्रे मूल वरून चालायची.  राष्ट्रपिता  महात्मा गांधीजी ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मूल भूमी. स्वातंत्र्य चळवळीत येथील गुजरी चौकात 1942 चा  चले जाव चा लढा लढल्या गेला. ब्रिटीशांविरुद्ध चले जाव चा नारा दिल्या गेला. स्वातंत्र्याचे वारे नसानसात भिनलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी तेव्हा ब्रिटीश पोलिसांशी दोन दोन हात करायला मागे पुढे पाहिले नाही. ब्रिटीशांच्या लाठयांचा मार खाला. अशी ही मूल  नगरी  वैभवशाली,ऐतिहासिक आणि राजकीय दृष्टया संपन्न आहे.  भाऊ, आपल्या विकासात्मक कार्यक्रमांनी या नगरीची दिशा बदलून गेली. मूल कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. मात्र, विविध पैलूंनी महत्वाचे असलेले हे गाव आज एका गोष्टी साठी मागे पडत आहे. ज्याकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे.  ती गोष्ट म्हणजे, भाऊ…  मूल येथिल गांधी चौकातील जिल्हा परिषदेची शाळा.  ब्रिटीशकालीन जिल्हा परिषदेची उच्च श्रेणी  प्राथमिक मुलांची शाळा. भाऊ ,  या शाळेची स्थापना 1911 रोजी झालेली आहे.ही ब्रिटीशकालीन शाळा आहे. या शाळेची इमारत ब्रिटीशकालीन आहे. एकेकाळी या शाळेचे वैभव फार मोठे होते. या शाळेची भरभराट होती. मुख्याध्यापक आद.सोनूलवार गुरूजी यांचा दरारा होता. वेगवेगळया क्षेत्रात या शाळेचे विदयार्थी  उच्च पदावर काम करीत होते आणि  आहेत. शाळेने गुणवंत, यशवंत  आणि कीर्तीवंत घडविले. शाळेच्या लौकीकाला पात्र ठरेल असा ठसा आजही या शाळेचे  माजी विदयार्थी उमटवित आहेत.वेगवेगळया क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेकांसाठी ही शाळा भूषणावह ठरली. परंतु ,भाऊ… आज या शाळेची दैयनीय अवस्था झाली आहे. विदयार्थी संख्या भरपूर असली तरी, वर्ग खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. जेमतेम वर्ग खोल्या आता शिल्लक राहिल्या आहेत. पावसाळयात पावसाचे पाणी पटांगणात जमा होते. गरीबा घरचे विदयार्थी या शाळेत उच्च शिक्षण घेत आहेत.हे विशेष बाब आहे. परंतु बसायला योग्य जागा सुदधा त्यांना नाही. भाऊ, ज्ञान मंदिरात ज्ञानार्जन योग्य झाले पाहिजे. त्यासाठी योग्य  सोयी सुविधा सुदधा आवश्यक आहे.त्यांचे मन रमले पाहिजे.शिक्षणाचा आनंद त्यांना घेता आला पाहिजे.ही शाळी आता मोडकळीस येत आहे.निर्लेखित होत आहे.सातत्याने पाठपुरावा केल्या नंतरही या शाळेकडे दुर्लक्ष होत आहे.ही गंभीर बाब आहे. भाऊ, आपण जिल्हयाचे पालकमंत्री आहात. शाळेचे गेलेले वैभव परत आणणे हे आपल्या हातात आहे. शाळेला नवीन इमारतीची गरज आहे.  दर्जेदार आणि विलोभनीय इमारतीचा आराखडा आवश्यक आहे. भाऊ, आपल्या स्वप्नातील जिल्हा परिषदेची शाळा तयार होवू दया. अशी अनेक माजी विदयार्थ्यांची इच्छा आहे. भाऊ,आपणच या शाळेला वाचवू शकता.  भाऊ, तीन दिवसात एकदा तरी या शाळेला भेट दया. गांधी चौकातील जिल्हा परिषद शाळेचे  वैभव आपणच परत आणू शकता. आपण स्वतः त्यासाठी प्रयत्न करावा,अशी आमची इच्छा आहे. भाऊ,शासनाच्या प्रत्येक योजना आता लाडक्या झाल्या आहेत. माय बाप सरकारवर जनता खूश आहे. आता विदयार्थ्यांच्या मनातही लाडका शब्द रूजू होवू दया. जिल्हा परिषदेची मराठी
शाळा वाचविणे काळाची गरज आहे. शिक्षण विभागातील रिक्त पदे भरणे सुदधा आवश्यक आहे.जिल्हयात गटशिक्षणाधिका-यांची पदे प्रभारी वर कार्यरत आहेत.शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारीवर ठेवून कसे चालेल. भाऊ,याकडेही लक्ष ठेवा. काही म्हणा, भाऊ, हा जनतेचा आवाज आहे. जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पोहचवत आहे. गांधी चौकातील जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा अर्थात आमची शाळा वाचवा. ऐवढी तमाम माजी विदयार्थ्यां सह येथे शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांची आशा आकांक्षा आहे. ही इच्छा आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगतो…!!
आपला

श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज
8975140998