वाघाच्या हल्ल्यात शेळ्या राखणारा शेतकरी ठार

190
वाघाच्या हल्ल्यात शेळ्या राखणारा शेतकरी ठार
मूल पासून तीन किमी अंतरावरची घटना
मूल :- गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या शेतशिवाराच्या परिसरात घरच्या शेळयांना चराई साठी नेलेल्या शेतक-यावर वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना काटवन बिटाच्या बफर झोन कम्पार्टमेंट नंबर 756 मध्ये  गुरूवारी सायंकाळी 4.30 वाजताच्या दरम्यान चिचोली येथे घडली.या घटनेने गावात खळबळ उडाली.मूल तालुक्यातील दोन महिण्यातील ही सहावी घटना आहे.मृतकाचे नाव  देवाजी वारलू राऊत,रा.चिचोली, वय 65 असे आहे. मूल पासून हा परिसर तीन किमीच्या अंतरावर आहे. देवाजी राऊत यांना चिचोली येथे एक एकर शेती आहे.शेती करण्यासोबत ते घरचे शेळया राखण्याचे काम करतात. याच परिसरात त्यांची शेती आहे.शेतीच्या परिसरात  शेळया चरत होत्या.हा परिसर झुडपी जंगलाचा आहे. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने देवाजी राऊत यांच्यावर हल्ला केला.  फरफरट नेऊन त्यांना जागीच ठार केले.त्यांच्या सोबत असलेले गुराखी भाऊजी नेवारे यांनी गावात येऊन घटना सांगितली. तात्काळ बफर झोनच्या वनविभागाला माहिती देण्यात आली.झुडपी जंगलात देवाजीचा मृतदेह आढळून आला.पंचनामा करून त्यांचा मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. घटनास्थळी बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर,पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी,क्षेत्र सहायक गजानन वरगंटीवार,वनरक्षक बंडू परचाके यांनी भेट दिली.
मूल तालुक्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिण्यातील ही सहावी घटना आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी ,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.तालुक्यातील मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मूल तालुक्यातील दोन महिण्यातील वाघाच्या हल्ल्यातील घटना
1) गणपत लक्ष्मण मराठे,रा.केळझर – 10-8-2024
2) विनोद बोलीवार,रा.बोरचांदली – जखमी – 12-08-2024
3) मुनीम रतीराम गोलावार, रा.चिचाळा – 19-08-2024
4)  गुलाब हरी वेलमे,रा.जानाळा –   01 -09-2024
5) वासूदेव झिंगरू पेंदोर, रा. मरेगाव – 03-09-2024
6) देवाजी वारलू राऊत,रा.चिचोली – 19-09-2024