ख्रिस्ती समाज बांधवांचा कफन पेटी मोर्चा तहसिलवर धडकला
स्मशान भूमीसाठी जागा द्या – मोर्चेकरांची मागणी
मूल :- स्मशानभूमीच्या जागेसाठी ख्रिस्ती समाज बांधवांचा कफन पेटी मोर्चा सोमवारी दुपारी तहसिल कार्यालयावर धडकला.यात शेकडो ख्रिस्ती समाज बांधव मोर्च्यात सहभागी झाले होते. मूल येथिल संत स्टेफन चर्च पासून मोर्च्याला सुरूवात झाली. रामलीला भवन , गांधी चौक, बस स्थानक मार्गे हा मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. मोर्च्याचे नेतृत्व रेव्ह.अॅन्थोनी परिच्छा,डॉ.मार्टीन अझीम,अॅड.अश्वीन पॉलीकर यांनी केले. मोर्चा मध्ये शासन आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.आमच्या कफन पेटीला जागा दया, स्मशान भूमीसाठी जागा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागील चाळीस वर्षापासून ख्रिस्ती समाज बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्याने हा कफन पेटी मोर्चा काढण्यात आला ,असे अॅड.अश्वीन पॉलीकर यांनी मोर्च्याला संबोधीत करताना सांगितले. सातत्याने पत्रव्यवहार करूनही प्रशासन समाज बांधवांची दिशाभूल करीत आहे. मोक्याची जागा असूनही आमच्या स्मशान भूमीसाठी प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहे.असा प्रश्न समाज बांधवांनी प्रशासनाला विचारला. येणा-या दिवसात समाजात कोणाचाही मृत्यू झाल्यास त्याला दफन करायचे कुठे? अन्यथा आम्ही मृतदेह तहसिल कार्यालयात आणून ठेवू.त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल असे समाज बांधवांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.आमच्या मागणीचा गांभिर्यांने विचार करून न्याय दयावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली. आमची मागणी पूर्ण न झाल्यास जोडी मारो आंदोलन करण्यात येईल. मोर्चे करांना संबोधित करताना एडवोकेट अश्विन पालीकर यांनी आक्रमकपणे प्रशासनाला जाब विचारला. मोर्चेकरांचे निवेदन उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार मृदूला मोरे यांनी स्वतः मंडपात येवून स्विकारले. पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता. मूल मध्ये ख्रिस्ती समाज बांधवाच्या कफन पेटी मोर्चाची चर्चा होती.या मोर्चाला कॉंग्रेसनेही पाठिंबा दर्शवीला होता. ख्रिस्ती समाज बांधव महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.