ऐन कापणीच्या हंगामात धानावर लष्करी अळीचा हल्ला – धान उत्पादक शेतकरी चिंतेत

37
ऐन कापणीच्या हंगामात धानावर लष्करी अळीचा हल्ला
धान उत्पादक शेतकरी चिंतेत

मूल :- ऐन कापणीच्या हंगामात धान पीकावर लष्करी अळीने हल्ला केला आहे.तालुक्यातील राजोली,डोंगरगाव,चिखली,चितेगाव,बेलगाटा या भागामध्ये लष्करी अळीने हमला करून शेतक-यांच्या चिंतेत भर पाडली आहे.याप्रकरणी कृषी शास्त्रज्ञ शेतांमध्ये जावून शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहेत. मूल तालुका हा धान उत्पादक पटटा आहे.खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे येथिल हे महत्वाचे पीक आहे.सध्या धान पीक कापणीच्या अवस्थेत आहे.तालुक्यातील काही भागामध्ये धान कापणी सुरू आहे. तालुक्यातील राजोली,डोंगरगाव,चिखली,चितेगाव,बेलगाटा या भागांमध्ये धान कापणी व्हायची आहे.त्याच संधीचा फायदा घेत लष्करी अळीने हल्ला करून पीकावर परिणाम पडायला लागला आहे.ही अळी टोळीने पिकावर आक्रमण करते.रात्रीच्या वेळी भात पीकाच्या लोंबीला कुरतळते.लोंबीचे तुकडे जमिनीवर पडलेले आढळतात.दिवसा पिकाच्या चुडात लपून बसते.त्यामुळे भात पिकाचे 25 ते 40 टक्के पेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता असते असे भाकीत सिंदेवाही येथील वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नागदेवते यांनी वर्तविले आहे. तालुक्यातील धान पीकावर लष्करी अळीचा मोठया प्रमाणात प्रार्दूभाव झाल्याचे आढळून आल्याने त्याच्या पाहणी करीता कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे,उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार,कृषी शास्त्रज्ञ विनोद नागदेवते,मूल येथिल तालुका कृषी अधिकारी सुनिल कारडवार,यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी राठोड,गजभिये,चटटे,नेवारे,गोपवार या कृषी विभागातील कर्मचा-यांनी शेतक-यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देवून त्यांना मार्गदर्शन केले.
हवामानाच्या बदलामुळे लष्करी अळीचा धान पीकावर मोठया प्रमाणात प्रार्दूभाव झालेला आहे.दिवसा ही अळी लपून राहते.रात्रीच्या वेळेस पीकावर हल्ला करते.शेतक-यांनी वेळीच पिकावर इमॅमेक्टीन बैन्झोऐट किंवा प्रोफेनोफॉस किंवा सायपरमेथ्रिन यापैकी कोणत्याही एका किटकनाशक औषधाची फवारणी करावी  आणि  पिकाचे नुकसान टाळावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनिल कारडवार यांनी केले आहे.