सोमनाथ,शिवटेकडी येथे भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा

130

सोमनाथ,शिवटेकडी येथे भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा
ठिकठिकाणी साबुदाणा खिचडी वाटप, शरबत वितरन
मूल :- महाशिवरात्री निमित्त सोमनाथ,शिवटेकडी,मॉ दुर्गा मंदिर येथे भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शिवभक्तांनी हर हर महादेव चा जयघोष केला. निसर्गरम्य वनराईने आणि काळया पाषाणावर धबधब्याच्या नजीक असलेल्या सोमनाथ मंदिरात सकाळ पासूनच शिवभक्तांनी गर्दी केली होती.येथे असलेल्या शिवलिंगाची भाविकांनी मनोभावे पुजा अर्चा केली. स्थानिक भजनी मंडळाचे येथे भजन सुरू होते. प्रसन्न चित्त वातावरण असलेल्या सोमनाथ मध्ये शेकडो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेवून येथिल निसर्गरम्य वातावरणाचा आणि धबधब्याच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटला. सोमनाथ येथे पंकज पुल्लावार आणि इतर शिवभक्तांच्या वतीन उपवासानिमित्त भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि भगर,उकळलेले रताळे यांचे वाटप करण्यात आले.

मूल येथील शिवटेकडी येथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. येथे असलेल्या शंकराच्या मूर्तीची मनोभावे पुजा अर्चा करण्यात आली. येथेही शेकडो भाविकांची गर्दी उसळली होती. मूल येथील किशोर कापगते,प्रविण मोहूर्ले,नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, आणि शिवटेकडी उत्सव समितीचे पदाधिकारी व   भक्त परिश्रम घेत होते.यावेळी भाविकांना साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. भजन गायनाने परिसर  भक्ती मय झालेला होता. 

 मूल येथिल श्री मॉ दुर्गा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाशिवरात्रीचा उत्सव मोठया भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.ममता रावत आणि संतोष रावत यांच्या हस्ते श्री मॉ दुर्गा देवीची महाआरती करण्यात आली. देवी पुजन,पंचामृत अभिषेक सोहळा,कुंकुम पुजन,साबुदाणा खिचडी आणि फळ वाटप आदी कार्यक्रम येथे पार पडले.

सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने मूल येथे शरबत वाटप करण्यात आले. सोमनाथ, मार्कंडा येथे जाणाऱ्या भाविकांनी या शरबत चा लाभ घेतला. स्वतः राकेश ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते परिश्रम घेत होते. 

सोमनाथ येथे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सह कुटुंब भेट देऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. मार्कंडा यात्रेसाठी मूल बसस्थानकापासून बसेस ची सोय करण्यात आली आहे. महाशिवरात्र निमित्ताने चंद्रपूर, मूल, सोमनाथ, गडचिरोली आणि मार्कंडा मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. यात्रा स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.