ख्रिस्ती कब्रस्तानसाठी जागेची टंचाई , चाळीस वर्षांपासूनची मागणी धुळखात

97
ख्रिस्ती कब्रस्तानसाठी जागेची टंचाई
चाळीस वर्षांपासूनची मागणी धुळखात
दफनविधीसाठी जावे लागते चंद्रपूरला
आर्थिक,शारीरिक व मानसिक त्रास
मूल :- विनायक रेकलवार

ख्रिस्ती समाज बांधवाच्या कब्रस्तानसाठी जागेची टंचाई निर्माण झाली आहे. मागिल चाळीस वर्षांपासूनची त्यांची  मागणी धुळखात पडली आहे. येथील प्रशासनाला त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याने ख्रिस्ती समाज बांधवाच्या भावना दुखावल्या जात आहे. दफनविधीसाठी त्यांना चंद्रपूरला जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक ,शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या मागणीला अद्यापपर्यत यश न आल्याने समाज बांधव तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. नगर पालिका कार्यालयावर कफनपेटी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मूल आणि तालुक्यात ख्रिस्तीसमाज बांधवाची चार हजारांच्यावर लोकसंख्या आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर रितीरिवाज पंरपंरेनुसार अंत्यसंस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक समाज बांधवाना स्मशानभूमीची आवश्यकता असते. जसा धर्म तसा वेष यानुसार प्रत्येक धर्माच्या क्रिया कर्म विधी या वेगवेगळया आहेत. ख्रिस्ती समाजामध्येही असाच रितीरिवाज आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याला दफन केले जाते. त्यासाठी जागेची अर्थात कब्रस्तानची आवश्यकता आहे. येथील समाज बांधवानी चाळीस वर्षापासून मूल हददीत कब्रस्तानची मागणी करीत आहे. त्यांच्या पाठपुराव्याला एकदाही यश आले नाही.त्यामुळे मूल हददीत जागेची टंचाई निर्माण झाली काय ?असा प्रश्न त्यांच्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने 1986 मध्ये गट नं 463 मध्ये 1.34 हे.आर जागा मंजूर केली.परंतु ती जागा  वादग्रस्त निघाली.त्या जागेवर अतिक्रमण असल्याने पालिकेने येथील अतिक्रमण काढण्याची कोणतीही कार्यवाही केली नाही. परत एकदा 1991 मध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या कडे जागेची मागणी केली. खसरा नंबर 282 मध्ये असलेली 1.59 जागा सोडून  मोकळी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ती जागाही त्यांच्या वाटयाला आली नाही. आजच्या घडीला चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. परंतु ख्रिस्ती समाज बांधवाला अजूनपर्यंत कब्रस्तानसाठी कोणतीही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही.ख्रिस्ती समाजाची ही समस्या आजही त्यांना भेडसावत आहे. समाजातील एखादया व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांना चंद्रपूर येथिल ख्रिस्ती कब्रस्तान मध्ये न्यावे लागते. त्याठिकाणी रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार पार पाडले जातात.विशेष म्हणजे चंद्रपूर येथेही जागेची टंचाई निर्माण झाली आहे. येथिल कब्रस्तानची जागा दफनविधीसाठी कमी पडायला  लागली असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
स्थानिक मूल मध्ये ख्रिस्ती समाज बांधवानी दोन ते तीन एकर जागेची मागणी केली आहे. पंरतु जागेच्या अभावी त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.ख्रिस्ती समाजामध्ये, दरवर्षी दोन नोव्हेंबर कब्रस्तान दिन साजरा केल्या जाते. आपआपल्या स्वर्गीय नातेवाईकांसाठी येथे जावून पुजा पाठ,प्रार्थना केली जाते. त्यापासूनही त्यांना वंचित राहावे लागत आहे.    

ख्रिस्ती समाजासाठी कब्रस्तानची मागणी मागिल चाळीस वर्षांपासून प्रशासनाकडे केली जात आहे.त्या मागणीला अद्याप यश आले नाही.त्यामुळे दफनविधीसाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. या मागणीसाठी कफनपेटी मोर्चा काढण्याचा इशारा आम्ही प्रशासनास देत आहोत. – अॅड.आश्विन पॉलिकर,मूल.
मूल येथील ख्रिस्ती समाज बांधवासाठी असलेला कब्रस्तानचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. एका जागेवर झुडपी जंगल दाखविल्या जात आहे.ती जागा देण्याचा मानस आहे.सदरील जागेवरील निर्वनीकरण झाल्यानंतर कब्रस्तानचा प्रश्न तातडीने मार्गी लागू शकतो.त्यासाठी तहसिलदार,मूल यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. – श्री.यशवंत पवार,प्रभारी मुख्याधिकारी,मूल