मूल नगर पालिकेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूकीची चर्चा – नागरिकंनी सतर्कता बाळगावी –  मुख्याधिकारी यांचे आवाहन

239
मूल नगर पालिकेत
नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूकीची चर्चा
नागरिकंनी सतर्कता बाळगावी –  मुख्याधिकारी यांचे आवाहन
बेरोजगारांना गंडवणारे ते महाभाग कोण?
मूल:- येथील नगर पालिकेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याची चर्चा मूल मध्ये आहे. येथील काही समाजसेवकांनी ही बाब पालिका प्रशासनाच्या  निदर्शनास आणून दिली. त्याबाबत मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी तात्काळ एक प्रसिदधी पत्रक जारी करून अशा फसवणुकीपासून सावधगिरी बाळगण्याचे  आवाहन नागरिकांना केले आहे. दरम्यान,नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक करणारे ते महाभाग कोण ? याची चर्चा मूल मध्ये चांगलीच रंगली आहे. या घटनेला बळी पडणा-यांनी पोलिस तक्रार दाखल केल्यास  मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधीही मूल नगर पालिकेत मालमत्ता कर पावती घोटाळा उघडकीस येवून चांगलाच गाजलेला होता.
सदया सर्वत्र पदभरती बंद असल्याने शिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण होत आहे.हाताला काम नसल्याने तरूणांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.कुठे काम मिळेल,नोकरी मिळेल याच्या शोधात उच्च शिक्षित बेरोजगार आहेत.त्याच संधीचा फायदा येथील काही महाभागांनी घेतलेला असल्याचे बोलल्या जाते.नगर पालिकेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे बोलल्या जाते. याची कुणकूण येथील काही समाजसेवकांना लागली.त्यांनी थेट मूल नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेवून ही बाब निदर्शनास आणून दिली. या घटनेबाबत पालिका प्रशासन सुदधा चक्रावली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी तात्काळ मंगळवारी (ता.20 मे) एक प्रसिदधी पत्रक जारी केले आहे.त्यात त्यांनी नगर परिषद आस्थापनेवरील कोणत्याही पदाकरिता पदभरती निघालेली नाही.अथवा प्रस्तावित नाही.नगर परिषद मूल पदभरती संदर्भातील कोणत्याही अनधिकृत सोशल मिडीयावरील मोबाईल संदेश आणि व्हॉटस अॅप वरील बातमीकडे लक्ष देवू नये.कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन केले आहे. अधिकृत बातमी करिता शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा असे त्यांनी प्रसिदधी पत्रकात म्हटले आहे. अशा प्रकारचे प्रसिदधी पत्रक सावली नगर पंचायतने सुदधा जारी केले आहे. दरम्यान नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना गंडविणारे ते महाभाग कोण?याचीच मूल मध्ये चर्चा आहे. नगर पालिका वर्तूळात सुदधा या घटनेची दिवसभर चर्चा होती.  याबाबत पोलिस तक्रार झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
  श्री. संदीप दोडे,मुख्याधिकारी,न.प.मूल म्हणतात :- 
:-मूल नगर पालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रकरण मूल येथील काही समाजसेवकांकडून माहित झाले. नगर पालिकेत पदभरती करण्याचे अधिकारी मुख्याधिकारी यांना नाही किंवा जिल्हाधिकारी यांना सुदधा नाही.पदभरतीच्या संदर्भात शासनस्तरावर जाहिरात काढल्या जाते.स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात. त्यानंतर शासनस्तरावर पुढील घडामोडी होतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अशा आमिषाला,भूलथापाला बळी पडू नये.ही चक्क फसवणूक आहे. अशी फसवणूक झाली असल्यास पोलिस तक्रार दाखल करावी.प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्कता बाळगावी.