दिवाळी लेख – आईची रांगोळी

199
दिवाळी लेख

आईची रांगोळी

माझी आई चौथा वर्ग पास.अक्षर जेमतेम.पण रांगोळी छान काढायची.महाराष्ट्र आणि आंध्र मिश्रीत. दिवाळीत तिच्या हातच्या रांगोळया घराच्या अंगणात असायच्या.ठिबक्याच्या रांगोळया काढायची.त्यासाठी ती आधी माझ्या जुन्या बुकाच्या पानात रांगोळया काढून बघायची. अशा ब-याच रांगोळया तिने काढल्या. ती रांगोळया काढताना पाहून मला फार आनंद व्हायचा.आईच्या रांगोळया पाहून मला रांगोळया काढायची सवय  लागली. रांगोळया रेखाटणे ही एक कला आहे. मुळात माझा आवडता विषय चित्रकला.मी वर्ग दुसरी पासून छान चित्रे काढायला लागलो.मग हळूहळू अंगणात रांगोळया काढायला लागलो.रांगोळी हातात घेऊन डिझाईन काढणे यात माझा हातखंड झाला. त्यात रंग सुदधा व्यवस्थित भरत होतो. मोर,बदक,फुले आणि इतर अनेक डिझाईन मी रांगोळीने दिवाळीत रेखाटल्या.अर्थात ही सवय मला आईने लावली.दिवाळी आली की माझ्या कडे हे काम आवर्जून असायचे.दुपारच्या वेळेला अंगणात पाणी टाकणे.मग,पांढ-या रांगोळीने डिझाईन काढून त्यात रंग भरणे.त्याला छान पैकी शेडींग देणे इत्यादी… इत्यादी.माझी काढलेली रांगोळी पाहायला परिसरातल्या महिला मंडळी येत असत.दिवाळीतील हे माझे अतिशय आवडते काम.हे माझे काम आजही मी आवडीने करतो.फक्त त्यासाठी मला दिवाळीची वाट पाहावी लागते. काल परवा घराची साफसफाई करता करता,मला रांगोळी काढलेले बुक सापडले.त्या बुकातील रेखाटलेल्या  रांगोळया आईने काढलेल्या होत्या.आई आज नाही.पण,तिची आठवण या रांगोळीच्या माध्यमातून झाली.ठिबक्याच्या काढलेल्या रांगोळया त्यात होत्या. आईच्या काळात बरेच जण ठिबक्याच्या रांगोळया काढल्या जात.चार ते एक,पाच ते एक,सहा ते एक,नऊ ते एक आणि पंधरा ते एक अशा अनेक ठिबके काढून छान रांगोळया रेखाटल्या जात होत्या.कसेही का असेना आई रांगोळया काढायची. रंग सुदधा छान भरायची. दुपारच्या वेळेला आराम करता करता मी दिलेल्या बुकात ती रांगोळी काढून बघायची. सापडलेला तो बुक मी माझ्या आठवणीत ठेवलेला आहे. आईच्या रांगोळयांची आठवण मला सदैव राहील.दिवाळी आली की त्या आठवणींना उजाळा मिळत राहणार हे विशेष! आईमुळेच मला चित्रकलेची आवड लागली.दिवाळीच्या दिवसात मी काढलेल्या रांगोळया अनेकांना आवडायच्या.माझे वडील अर्थात आमचे दादा आवर्जून शाबासकी दयायचे.आमचे स्नेही सोनूलवार गुरूजी दिवाळीच्या दिवसात हमखास यायचे.  त्यांची बरेचदा आमच्या घरी फेरी व्हायची.ते तर रांगोळी बघून एकदम खुश व्हायचे.माझ्या कुटुंबातील सदस्य माझी मोठी ताई,मोठा भाऊ,लहान ताई,भाऊजी,भाचे,भाच्या या संगळयांना माझ्या रांगोळयांविषयी,माझ्या कलेविषयी ज्ञात आहे. काही वेळेला मी दिवाळीच्या काळात माझ्या मोठया ताईच्या घरी सुदधा छान पैकी रांगोळया रेखाटल्या आहे. लग्न झाल्या नंतर माझी जोडीदार चेतना ,आता माझी मुलगी धनश्री या सर्वांना सुदधा माझ्या कलेविषयी अवगत आहे. आता चेतना आणि धनश्री रांगोळया काढतात. संस्कार भारती असा त्यांच्या रांगोळींचा प्रकार. दिवाळीत धनश्री माझ्या हमखास मागे लागते.बाबा,तुम्ही पण एक छान रांगोळी काढा नं. आणि मी माझी कला रांगोळीच्या माध्यमातून दर्शवितो. बीएडला असताना रांगोळी स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता.हे विशेष! हीे रांगोळीची कला मी माझ्या आईकडून शिकलो. तिचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठिशी आहेतच.दिवाळी आली की हा रांगोळीचा विषय ताजा होतो.आली माझ्या घरी दिवाळी असे गाणे गुणगुणायला सहजच सुरूवात होते.दिवाळी,दिवाळीची पहाट,रांगोळी,दिव्यंाची आरास,विजेचे दीपमाळ आणि फराळांची चंगळ,वेगवेगळे रंग असे  सारे काही अदभूत आणि उत्साहपूर्ण वातावरण असते. दिवाळीत थंडीला सुरूवात झालेली असते.अशा विलक्षण आनंद देणा-या वातावरणात दिवाळी सुखरूपपणे पार पडते. दिवाळीचे पाच दिवस कसे भुर्रकन उडुन जातात हे कळत सुदधा नाही. मात्र ,आईच्या रेखाटलेल्या रांगोळया सदैव स्मरणात जपून राहतात…!!!

श्री.विनायक रेकलवार,मूल
8975140998