मूल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 – विश्लेषण – कॉंग्रेसच्या उमेदवारांचे भाजपा उमेदवारांपुढे तगडे आव्हान ? कोण जिंकणार – कोण हरणार ? नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत

191
मूल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 विश्लेषण
कॉंग्रेसच्या उमेदवारांचे भाजपा उमेदवारांपुढे तगडे आव्हान
कोण जिंकणार – कोण हरणार ?
नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत

मूल:- विनायक रेकलवार
येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण तापत आहे. ही निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे. त्यात सुरूवाती पासूनच कॉंग्रेसच्या उमेदवारांचे तगडे आव्हान भाजपाच्या उमेदवारांला झेलावे लागत आहे.नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होण्याची शक्यता आहे. कांग्रेस च्या  एकता प्रशांत समर्थ विरूदध भाजपाचे प्रा.डॉ.किरण किशोर कापगते यांच्याशी हा सामना रंगणार आहे. नगर पालिका निवडणुक अटीतटीची होण्याची शक्यता राजकीय वर्तूळात वर्तविल्या जात आहे.कोण जिंकणार – कोण हरणार हे चित्र सदया अस्पष्ट आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा,कॉंग्रेससह अनेकांनी  नामांकन अर्ज सादर केले. दुस-याच दिवशी प्रभाग दहाचे नगर सेवक पदाचे 10 ब मधील    कॉंग्रेेसचे उमेदवार राहूल प्रेमलवार यांनी भाजपाचे  निलेश रॉय यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. हा आक्षेप आडनावाच्या नावावरून होता. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.ही तक्रार तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरवून भाजपाच्या उमेदवाराला दिलासा दिला असला तरी,भाजपासाठी ही एक तगडे आव्हानाची सुरूवात ठरली. राहूल प्रेमलवार यांनी स्पिनर बॉल टाकून भाजपाच्या उमेदवाराची दांडी उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खेळाडू बचावला. त्यामुळे राजकीय वर्तूळात निवडणुकीच्या वातावरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यंदा प्रथमच कॉंग्रेसने नव्या दमाचे शूर शिपाई निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.फक्त एक राकेश रत्नावार यांचा सारखा अनुभवी डावपेच राजकारणी, उमेदवार म्हणून  परत एकदा रिंगणात उतरवून मुख्य शिलेदार ठरण्याची शक्यता आहे. राकेश रत्नावार हे नगर पालिकेचे उपाध्यक्ष पदापर्यत पोहचलेले मातब्बर नगरसेवक आहेत.त्यांना मूल नगर पालिकेचा पूर्ण अभ्यास आहे. मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले राकेश रत्नावार यांची भूमिका नगर पालिका निवडणुकीसाठी महत्वाची ठरणार आहे. बाकी सर्व उमेदवार नवीन चेह-याचे असून त्यांच्यात जोश आणि हौश आहे. आपल्या वार्डाच्या विकासासाठी एक नवा ध्यास घेतलेले होतकरू उमेदवार आहेत. भाजपामध्ये काही उमेदवार नवीन असले तरी पक्षाने ब-यांच जुन्याच चेह-यांना परत एकदा  संधी दिलेली आहे. माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांचा सारखा एकनिष्ठ जेष्ठ कार्यकर्ता भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नंदू रणदिवे सुद्धा भाजपतर्फे मुख्य शिलेदार ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नवीन चेह-यांचे तगडे आव्हान  भाजपाच्या जुन्या चेह-यांपुढे राहणार आहे. एकमेकांचे तगडे आव्हान कसे पेलतात याकडे मतदारांची उत्सुकता लागली आहे. नव्या दमाचे नवे शूर शिपाई बाजी मारतात की ,जुन्या चेह-याचे जुने मातब्बर बाजी मारतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत :- 

मूल नगर पालिका निवडणुकीत थेट जनतेमधून नगराध्यक्ष पद निवडले जाणार आहे. नगराध्यक्ष पद इतर मागास वर्ग प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे.त्यात  कॉंग्रेसकडून एकता प्रशांत समर्थ,भाजपाकडून प्रा.डॉ.किरण किशोर कापगते,शिवसेना शिंदे गटातून भारती सुनिल राखडे,बसपा कडून चैताली मल्हारी मद्रीवार आणि गीतांजली शोन तांगडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावित आहेत.सदयातरी पाच उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात असले तरी,थेट लढत कॉंग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये होण्याची शक्यता राजकीय वर्तूळात आहे.एकता समर्थ गृहीणी असल्या तरी प्रशांत समर्थ यांचा राजकीय प्रवास खोलवर पसरलेला आहे.त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. वार्डातील समस्यांची त्यांना जाणीव आहे.अडीअडचणी प्रसंगी धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची जनमान्य ओळख आहे. कोरोना काळातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगी होते. त्यामुळे त्यांनी आरक्षणानुसार आपल्या सौभाग्यवतीला निवडणुकीच्या रिंगणात कॉंग्रेस तर्फे उतरवून  भाजपाच्या उमेदवाराला तगडे आव्हान दिले आहे. दुसरीकडें भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.किरण  किशोर कापगते या प्राध्यापिका आहेत.सुशिक्षित आहेत.राजकीय वातावरणाचा त्यांना अभ्यास आहे. संघाशी त्यांचे नाते निगडीत आहे.त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे.त्यातून कोण बाजी मारतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.शिंदे गटाच्या भारती सुनिल राखडे,बसपाच्या चैताली मल्हारी मद्रीवार या किती मतदान घेतात.यावर पुढील गणित अवलंबून राहणार आहे. मूल नगर पालिकेमध्ये  कौन बनेगी नगराध्यक्षा हे चित्र तीन डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
डबल एस च्या हाती निवडणुकीची सूत्रे:-

मूल नगर पालिकेच्या निवडणुकीत डबल एस च्या हाती निवडणुकीची सूत्रे राहणार आहे. यातील एक एस म्हणजे आ.सुधीर मुनगंटीवर आणि दुसरे एस म्हणजे कॉंग्रेेसचे प्रदेश महासचिव संतोष सिंह रावत. या दोन्ही एस ची भूमिका निर्णायक ठरणार  आहे.मूल नगर पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा  असे दोन्ही नेत्यांच्या मनातील भावना आहेत. मतदार डबल एस पैकी कोणाला  विजयाचा गुलाल उधळायला लावतात हे तीन डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.