संपादकीय
…. आता विकासाची जबाबदारी सत्ताधारी कॉंग्रेसची
मूल नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मूलवासिय मतदारांनी कॉंग्रेसच्या पदरात भरभरून दान टाकले. कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ या थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्या.तर,वीस पैकी 18 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडून आले.सत्ता परिवर्तनाची खरी किमया मतदारांनी घडवून आणली.आत्ता पर्यंत मूल नगर पालिकेवर भाजपाची सत्ता होती.त्या विरूदध जावून मतदारांनी काही आशा,आकांक्षा आणि अपेक्षांसह कॉंग्रेसला मूल नगर पालिकेच्या सिंहासनावर बसविले आहे.त्या आशा,आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याची,मूल शहराच्या सर्वांगिण विकासाची,मूलभूत सोयी सुविधा सोडविण्याची पूर्ण जबाबदारी आता सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाची राहणार आहे.अर्थात सत्तेवर बसणा-या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांची राहणार आहे.लोकसेवक म्हणून नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ आणि प्रभागातून निवडून आलेेले कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आज लोकसेवक म्हणून आपला पदभार सांभाळणार आहे. पदग्रहण समारंभ सोहळा साजरा करण्यात येणार आहे.हा पदभार स्वीकारल्यानंतर ख-या अर्थाने या लोकसेवकांची नवीन इनींग सुरू होणार आहे. लोकसेवक म्हणून मतदारांच्या अर्थात मूल वासियांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालणे त्यांचे प्रथम कर्तव्य ठरणार आहे.जात पात,पक्ष भेद विसरून शहराच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. नगराध्यक्ष पद थेट जनतेतून असल्याने जनतेच्या मनातील आवाज ओळखण्याची खरी कसरत थेट नगराध्यक्षांना करावी लागणार आहे.जनतेचा आवाज त्यांनी अचूकपणे ओळखावा अशी तमाम मूलवासियांची अपेक्षा आहे.आणि म्हणूनच त्यासाठीच मतदारांनी भरभरून मतदानाच्या रूपाने एकता प्रशांत समर्थ यांना कदाचित निवडून आणले असावे अशी जनसामान्यांची भावना आहे. मूल शहरातील प्रश्न अनेक आहे. समस्यांचा डोंगर मूल शहरात उभा आहे.त्यामुळे विकासाच्या मुदयावर त्यांना थेट हात घालावा लागणार आहे. या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून सुदधा नगर पालिकेतील सत्ताधा-यांना विकासाची अपेक्षा ठेवावी लागणार आहे.शेवटी विकासासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. तो निधी कसा मिळवता येईल,हे खरे तगडे आव्हान सत्ताधा-यांपुढे राहणार आहे.मतदारांना मूलभूत सोयी सुविधांची गरज आहे.रस्ते,वीज,पाणी या तीन गोष्टींची पूर्तता करणे गरजेेचे आहे.मूल शहरातील पाणी पुरवठयावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.स्वच्छ आणि शुदध पिण्याचे पाणी हा मूलवासियांचा अत्यंत जिव्हाळयाचा प्रश्न आहे. तब्बल चार वर्षानंतर नगर पालिकेच्या निवडणुका झाल्या.या चार वर्षात प्रशासकाच्या काळात मूल शहरातील विकासाचा बटटयाबोळ झाला.तो निस्तारणे सत्ताधा-यांसाठी खरे आव्हान आहे.स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेंच्या माध्यमातून मूल नगर पालिकेने मिळवलेल्या बक्षिस रूपी निधीचे काय झाले?याचे उत्तर प्रशासकांनी अजूनपर्यंत जनतेच्या दरबारात ठेवले नाही. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कारंजे उभारले,छोटया बगिच्यांची निर्मिती केली.प्राण्याचे पुतळे मांडले.त्या सर्वांची आता दुरावस्था झाली आहे.कारंज्यातील पाणी फवा-यांच्या रूपाने तृषारांसारखे उडलेच नाही. कारंज्याचे सांगाडे ठिकठिकाणी उभे आहेत. या अशा भंकास विकासाचे स्वरूप सत्ताधा-यांना पुढे खरे आव्हान ठरणार आहे. प्रभागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.नाल्यांची अवस्था दयनीय आहे.स्वच्छतेचा मोठा गहन प्रश्न सत्ताधा-यांपुढे आव्हान ठरणार आहे.अतिक्रमणाचा मोठा गंभीर प्रश्न आहे.रस्त्यावरील अतिक्रमण बाजूला सारून जनसामान्यांच्या सुरूक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्याचे काम सत्ताधा-यांना करावे लागणार आहे. शहरातील स्वागत गेट वरील नाम फलकांची दुर्दशा झाली आहे.डिव्हायडरची गंभीर अवस्था आहे.तेरा करोड रूपये खर्चून बांधलेल्या आणि सदया दुरवस्थेत सापडलेल्या दुकान चाळीचे नियोजन नवीन सत्ताधा-यांपुढे आव्हानात्मक राहणार आहे. असे अनेक प्रश्न सत्ताधा-यांपुढे आहे. आणि ते आव्हानात्मक आहेत. स्वच्छ आणि सुंदर मूल या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे खरे आव्हान कॉंग्रेसच्या नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांच्या पुढे राहणार आहे.शहरातील अनेक प्रश्न,समस्या,जनतेचा आवाज,मूलभूत सोयी सुविधा नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ आणि नगरसेवक कसे पेलतात , याकडे मूलवासियांचे लक्ष राहणार आहे. विकासाचा अजेंडा आणि त्यासाठी लागणारा निधी खेचून आणण्यासाठी सत्ताधा-यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे,यात तीळमात्र शंका नाही. ब-याच वर्षानंतर कॉग्रेसला मूल नगर पालिकेवर सत्ता स्थापन करता आली आहे. या सुवर्ण संधीचे सोने करण्याची किमया त्यांना साधावी लागणार आहे.ती संधी सत्ताधारी कसे लिलया पार पाडतात, याकडे जनतेच्या आवाजाचे लक्ष राहणार आहे. तुर्तास पदग्रहण समारंभासाठी शुभेच्छा…!!!
श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज




