मानव विकासच्या मोफत सायकल योजनेचा फज्जा

71
मानव विकासच्या मोफत सायकल योजनेचा फज्जा
जिल्हयातील हजारो शाळकरी मुली प्रतिक्षेत
मागिल शैक्षणिक सत्रात सायकल मिळाल्याच नाही
मूल:- विनायक रेकलवार
मानव विकास मिशन कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येणा-या शाळकरी मुलींसाठी मोफत सायकल योजनेचा जिल्हयात फज्जा उडाला आहे. 2025-26 या शैक्षणिक सत्रात चंद्रपूर जिल्हयातील पात्र असलेल्या  एकाही विदयार्थीनीला  सायकलचा  लाभ मिळाला नाही.त्यामुळे ग्रामिण भागात नाराजी व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम पाच किमी अंतरापासून शाळेत येणा-या इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विदयार्थींनीवर पडला आहे. एकीकडे ग्रामिण भागातील शाळा विदयार्थ्याअभावी ओस पडण्याची भिती व्यक्त होत असताना,दुसरीकडे मात्र ,शिक्षणाची आवड असणा-या विदयार्थीनीना सायकलचा लाभच मिळाला नसल्याने शाळेत जायचे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात जिल्हयातील ग्रामिण भागातील अनेक शाळा अडचणीत सापडल्या आहेत.  महाराष्ट्र सरकार ग्रामिण भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळकरी मुलींसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत सायकल योजना राबविते. 0 ते 5 किमी अंतरावर असलेल्या विदयार्थीनीसाठी ही योजना आहे. या योजनेतंर्गत शाळेचे अंतर जास्त असणा-या विदयार्थींनीना सायकली किंवा थेट बॅंक खात्यात अनुदान दिले जाते.ग्रामिण भागातील आणि दुर्गम भागातील वर्ग 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विदयार्थीनींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे,गळतीचे प्रमाण कमी व्हावे असा या योजनेचा उद्येश आहे.यासाठी पात्र असलेल्या विदयार्थीनींना पाच हजार रूपये थेट बॅंक खात्यात जमा होतात. परंतु मागिल 2025-26 या सत्रात चंद्रपूर जिल्हयातील पात्र असणा-या एकाही विदयार्थिनीला या योजनेचा लाभ मिळाला नाही.जुने सत्र संपले.आता 15 जून पासून नवीन सत्राला सुरूवात होईल.तरीही मोफत सायलकचा पत्ता नसल्याने ग्रामिण भागातील माध्यमिक शाळांतील शाळकरी विदयार्थींनीवर याचा मोठा परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. शिक्षण विभागामार्फतीने मोफत सायकल योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कळविण्यात आली आहे. प्रत्येक शाळांनी आपआपल्या स्तरावर पात्र विदयार्थीनींचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केला.परंतु,मागिल सत्राच्या शेवट पर्यंत सायकली अथवा थेट अनुदान प्राप्त न झाल्याने मानव विकासच्या  या योजनेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी हे या योजनेचे प्रमूख असतात. त्यामुळे विदयार्थीनींच्या सायकल लाभासाठी त्यांच्या प्रयत्नाकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे. पात्र असलेल्या सर्वच विदयार्थीनींना मोफत सायकल योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी जोर पकडत आहे.
मान्यवर काय म्हणतात :- मोफत सायकल योजने अंतर्गत शाळांच्या माध्यमातून पात्र विदयार्थीनींचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले.ग्रामिण भागातील शाळेपासून 0 ते 5 किमी अंतर असलेल्या इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या एकाही विदयार्थीनींना या योजनेचा मागिल सत्रात लाभ मिळाला नाही.ग्रामिण भागात वाघाची आणि इतर वन्यप्राण्यांची भिती आहे.मुली शाळेत पायदल येवू शकत नाही. मुलींच्या शिक्षणासाठी या योजनेचा लाभ मिळावा.  — राजेश सावरकर,अध्यक्ष,मुख्याध्यापक संघ,मूल