धानावर आधारीत उद्योग उभा राहण्यासाठी पाठपुरावा करणार – आ. विजय वडेट्टीवार यांची ग्वाही

119

धानावर आधारीत उद्योग उभा राहण्यासाठी पाठपुरावा करणार – आ. विजय वडेट्टीवार यांची ग्वाही

मूल : देशातल्या अनेक राज्यात उच्च प्रतिचा तांदुळ उपलब्ध करून देणारा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्हयातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मूल आणि ब्रम्हपूरी तालुक्यात धानावर आधारीत मोठा उद्योग उभा करावा. अशी विनंती माजी राज्यमंत्री तथा काॅंग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना केली आहे.

सावली येथुन चंद्रपूर मार्गे मुंबई कडे जात असताना प्रवासा दरम्यान आ. विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. मूल तालुका हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह तालुका असून आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांचा पालक जिल्हा आहे. त्यामूळे त्यांना निवेदन पाठविले असून मूल आणि ब्रम्हपूरी तालुक्यातील भात गिरण्या आणि उद्योगधंदयाची सध्यास्थिती अवगत करून दिल्याचे सांगीतले. ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचा आमदार असलो तरी काॅंग्रेस नेता म्हणून माझी नाळ ब्रम्हपूरी क्षेत्रासोबतचं जिल्हयातील प्रत्येक तालुक्याशी जुळली आहे. मूल तालुक्यातील संतोष रावत यांचा सारखा खंदा नेता आणि काॅंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचेशी आपला प्रत्यक्ष संवाद असल्याने त्यांचे माध्यमातून तालुक्यात विकास आणि सेवेची अनेक कामे केली, परंतू आमदार म्हणून आपला ब्रम्हपूरी क्षेत्राशिवाय अन्य तालुक्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने विविध तालुक्यात केलेल्या कामांचा प्रचार आणि प्रसार केला नाही. अशी खंत व्यक्त करतांना आ. विजय वडेट्टीवार यांनी यापुढील काळात जनसेवा आणि जिल्हयाचा विकास डोळयासमोर ठेवुन कार्ये करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. जिल्हयात सर्वाधिक भात गिरण्या हया मूल आणि ब्रम्हपूरी तालुक्यात आहेत. नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष, वायगांवची हळद, लासलगांवचा कांदा, भिवापूरची मिरची आणि लोणावळयाची चिक्की ज्या प्रमाणे प्रसिध्द आहे त्याप्रमाणे मूल आणि ब्रम्हपूरीचा तांदुळही देशात प्रसिध्द आहे. त्यामूळे भात गिरण्यांवर आधारीत उद्योग मूल आणि ब्रम्हपूरीच्या परिसरात उभे राहावे अशी अपेक्षा ठेवून यापुर्वी पाठपुरावा केला. परंतू शासनाच्या उदासीन धोरणांमूळे परिसरात धानावर आधारीत एकही मोठा उद्योग उभा राहू शकला नाही. याविषयी खंत व्यक्त करतांना आ.विजय वडेट्टीवार यांनी मूल आणि ब्रम्हपूरीच्या परिसरात धानावर आधारीत मेगा क्लस्टर उद्योग उभा राहावा म्हणून यापुढील काळात जोरात पाठपुरावा करणार असल्याचे सांगीतले. वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून मूल तालुक्याचा विकास होत असला तरी रोजगाराच्या बाबतीत मूल तालुका अजूनही विकासापासून वंचित आहे. मूल तालुक्यातील अनेक उच्च शिक्षीत बेरोजगार रोजगारासाठी अनेक मोठया शहरांकडे गेले व जात आहेत. त्यामूळे त्यांच्या उच्च शिक्षणाचा लाभ तालुक्याला मिळावा अशी आपली धारणा असल्याने धान उत्पादक तालुका असलेल्या मूल तालुक्यात धानावर आधारीत मेगा क्लस्टर प्लाॅन्ट उभा राहील्यास धानापासून निघणा-या कोंडयाचा वापर विद्यूत निर्मितीसाठी, कुक्कुसापासून कोरोस्टाॅल विरहीत राईस ब्रॅन तेल, बारीक झालेल्या तांदळाच्या खंडापासून वेगवेगळे पदार्थ निर्माण करण्याचे अनेक उद्योग उभे राहून तालुक्यातील किमान 10 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होवू शकतो. असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. राज्य व केंद्र शासनाने समन्वय साधून मूलच्या परिसरात धानावर आधारीत उद्योग निर्माण करण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करावी. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगतांना याकरीता लवकरच तालुक्यातील काॅंग्रेस पदाधिकारी, भात गिरणीचे मालक यांना घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगीतले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नगर परिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, नगर परिषद सभापती प्रशांत समर्थ, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम येनुरकर, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, नगर सेवक अशोक येरमे, गुलाब पठाण आदि उपस्थित होते.