181

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मूल:- विनायक रेकलवार
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यास सांगितले आहे.तशा सूचना सर्व जिल्हाधिका-यांना दिले असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मूल मध्ये दिली. मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांच्या घरी फडणवीस वाड्यात कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त त्यांचा मूल मध्ये दौरा होता. तत्पूर्वी त्यांनी येथील विश्राम गृहामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले, पुरग्रस्तांचे पंचनामे करताना फार कायदयांवर किंवा नियमांवर बोट ठेवू नका. पूरग्रस्तांना त्रास होईल असे वागू नका असे प्रशासनाला सांगितले असल्याचे ते म्हणाले. जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे. सर्व नुकसानीची माहिती आल्यानंतर अधिकची काय मदत करायची ते सरकार करेल असे ना.देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मराठवाडयातील आठही जिल्हाधिकारी यांच्याशी मी अतिवृष्टीबाबत सकाळी चर्चा केली आहे.सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी सुदधा चर्चा झाली आहे. उपाययोजना संदर्भातील सूचना जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या रिलीफ कॅम्प मध्ये जेवणाची उत्तम सोय,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जनावरांच्या चा-याची व्यवस्था करण्यात आली आहे. मदतीचे वाटप सुरू केले आहे.ज्यांच्या घरात पाणी घुसले,त्यांनाही दहा हजार रूपये मदतीचे वाटप सुरू केले आहे.अन्न धान्य वाटपाची सुरूवात झाली आहे.खालची यंत्रणा व्यवस्थीत काम करते की नाही याबाबत जिल्हयाधिका-यांना लक्ष देण्यास सांगितले असून जिल्हा प्रशासनाला फील्डवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याच्या विसर्गाचा अंदाज घेवून त्या भागातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाच्या संदर्भात आज उदया आणि परवा असे तीन दिवस महत्वाचे आहे.परतीच्या पावसाचा सुदधा राज्याला धोका आहे.दोन तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला प्रशासनाला सांगितले असल्याचे ना.देवेंद्र फडणवीस म्हणाले.लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वार्तालाप प्रसंगी पालकमंत्री ना.अशोक उईके,आ.सुधीर मुनगंटीवार,आ.देवराव भोंगळे,आ.किशोर जोरगेवार,जिल्हाधिकारी विनय गौडा ,जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन उपस्थित होते.

फडणवीस वाडयात नवरात्री निमित्त कौटुंबिक कार्यक्रम :-
मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांच्या कडे असलेल्या नवरात्री निमित्त कौटुंबीक कार्यक्रमाच्या संदर्भात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता.मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच आपल्या स्वगावी आले. मूल मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. जवळपास दोन तीन तास फडणवीस वाडयात ते कौटुंबीक कार्यक्रमात व्यस्त होते. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रित्यर्थ मूल मध्ये पोलिस बंदोबस्त चोख होता. उमरेड,भिवापूर,सिंदेवाही मार्गे मुख्यमंत्र्यांचे मूल मध्ये सकाळी अकरा वाजता आगमन झाले.