दिवाळी सणात रस्त्यांवर अतिक्रमण – जनता त्रस्त , प्रशासन सुस्त

217
दिवाळी सणात रस्त्यांवर अतिक्रमण
जनता त्रस्त , प्रशासन सुस्त

मूल:- उत्साहाचे कारंजे आणि आनंदाचे भरते असलेल्या दिवाळी सणात रस्त्यांवर मोठया प्रमाणात अतिक्रमण निर्माण झाले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.यामुळे वाहनचालक आणि जनता त्रस्त आहे,तर प्रशासन सुस्त झाले आहे. शनिवार पासून दिवाळी सणाला सुरूवात झाली.त्यानिमित्ताने बाजारपेठेत वेगवेगळया वस्तू खरेदीसाठी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.जास्तीत जास्त गर्दी कापड दुकानात असल्याचे निदर्शनास येत आहे.दुकानात आलेल्या ग्राहकांच्या वाहनांना पांर्किंगची सुविधा निर्माण करून देण्याचे काम हे संबधित दुकानदारांचे आहे.परंतु तशी सुविधा मूल मध्ये कुठेही नसल्याने ग्राहकांची वाहणे रस्त्यांवर उभी राहत असल्याचे दृष्टीस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनाच्या अतिक्रमणामुळे,रस्त्यांवर ठेवल्या जाणा-या सामानांमुळे आणि इतर वेगवेगळया छोटया दुकानांमुळे रस्ता अतिक्रमणात गायब होत आहे. अख्खा रस्ताच अतिक्रमणात गिळंकृत होत आहे.यामुळे रस्त्यांवरील वाहतूक मोठया प्रमाणात विस्कळीत होत आहे.याचा फटका छोट्या, मोठ्या वाहनचालकांसहीत सर्वसामान्य पादचारी जनतेला बसत आहे. 
सोमनाथ मार्ग ते  विश्राम गृह  मार्ग तसेच चंद्रपूर मार्ग ते गडचिरोली मार्ग अतिक्रमणात गिळंकृत झालेला आहे. गडचिरोली मार्गावर दुचाकी वाहनांची दुरूस्ती दुकाने बरीच आहेत. येथील कामगार रस्त्यांवरच वाहने दुरूस्ती करताना दिसतात. याकडे स्थानिक नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सणांचे दिवस आणि त्यानिमित्ताने होणारी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलिस सुदधा मुख्य मार्गावर आपले कर्तव्य बजावताना दिसत नसल्याचा आरोप होत आहे.

सणांच्या निमित्ताने होणारी गर्दीला नियंत्रित आणण्यासाठी आणि मुख्य मार्गावरील वाहनांचे अतिक्रमण थांबविण्यासाठी प्रत्येक दुकानदारांना स्वतःची पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनाने प्रवृत्त करावे अशी मागणी जनतेचा आवाज करीत आहे. संबधित दुकानदारांनी आप आपला सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी होत आहे. केवळ दिवाळी सणातच मूल मध्ये रस्त्यांवर अतिक्रमण राहत नाही,तर इतर वेळेसही मुख्य मार्ग अतिक्रमणाने व्यापलेला राहतो. हे स्थानिक नगर पालिका प्रशासनाचे अपयश असल्याचे एका नागरिकांने जनतेच्या आवाजशी बोलताना सांगितले. रस्त्यांवरील अतिक्रमणा बाबत नगर पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे मूल वासियांचे लक्ष लागले आहे.