सेंद्रीय शेती म्हणजे समृदधी व बचतीचा महामार्ग – आनंदराव शेंडे

276
बोरूचा वापर करून सेंद्रीय शेती केली अधिक कसदार
आनंदराव शेंडे यांचा धान शेतीतील प्रयोग
खर्च कमी – उत्पन्न जास्त
सेंद्रीय शेती म्हणजे समृदधी व बचतीचा महामार्ग

मूल:- विनायक रेकलवार
सेंद्रीय शेती म्हणजे समृदधीचा महामार्ग आहे.कमी खर्चात धानाची शेती भरघोष उत्पन्नासह करता येते.धान उत्पादक शेतक-यांची मोठी बचत यामुळे होवू शकते. बचतीचा महामंत्र प्रत्यक्षात साकारणारे शेतकरी आहेत आनंदराव शेंडे. त्यांनी हे साध्य करून दाखविले आहे. यंदा त्यांनी प्रथमच बोरूचा वापर करून सेंद्रीय शेती अधिक कसदार केली आहे. योग्य रित्या नियोजन करून त्यांनी धानाची लागवड केली आहे.त्यात त्यांना मोठा फायदा झाला आहे. मूल येथील प्रगतशिल शेतकरी आणि व्यापारी आनंदराव शेंडे यांची तालुक्यातील भवराळा येथे बारा एकर धानाची शेती आहे.येथे ते चौदा वर्षांपासून शेती करीत आहेत.परंपरांगत शेती मध्ये याआधी त्यांना बिजाई जास्त आणि खर्च सुदधा जास्त लागत होता. परंतु,कृषी तज्ज्ञ डॉ.मिश्रा यांच्या मार्गदर्शन सल्ल्यानुसार त्यांनी आधुनिक शेतीकडे पाउल टाकले.एक प्रयोग म्हणून त्यांनी डॉ.मिश्रा यांचे मार्गदर्शन त्यांनी उपयोगात आणले.मागिल पाच वर्षांपासून शेंडे एका एकराला फक्त पाच किलो बिजाई वापरतात. त्याचे ते योग्य नियोजन करतात. शेतबांध्यात धानाच्या  फक्त एक एक रोपांची लागवड करतात. धान प-हयांची दूर दूर लागवड  केल्याचे ते सांगतात. दर बारा इंचावर धानपीकाची लागवड करून त्यांनी एक हवेशिर वातावरण तयार केले.त्यामुळे धानाला  रोगराई लागली नाही.फवारणी फारसी करावी लागली नाही.शेतात उच्च दाबाचे दिवे लावून मावातुडतुडा या किडी पासून पीकाचे सरंक्षण केले. सेंद्रीय शेतीत मजूरी आणि फवारणीच्या खर्चात बचत झाली. जवळपास लाख रूपयांची बचत त्यांनी केली.सरासरी 255 पोते धानाचे उत्पन्न त्यांनी घेतले.
यावर्षी आनंदराव शेंडे यांनी  उन्हाळयात शेतबांध्यामध्ये बोरूची लागवड केली. बोरूची वाढ झाल्यानंतर यंत्राने शेतबांध्यातच त्याला मुरविले.सुपर फास्फेटचा वापर करून अधिक त्याला सडविले.अशाप्रकारे बोरूचा वापर करून तयार झालेले खत  सेंद्रीय शेतीत उपयोगी पडले आहे. त्यांच्या बारा एकरातील शेतीत धानाचे पीक यावर्षी अधिक जोमदार उभे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा निंदा अर्थात गवत कचरा काढण्याचा खर्च वाचला. आपल्या सेंद्रीय शेतीत ते रासायनिक खत किंवा रासायनिक फवारणी करीत  नाही. उच्च प्रतिचे धान बियाण्यांचा त्यांनी वापर केला आहे. उत्पन्नात अधिक भर पडण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.त्यांच्या प्रयोगामुळे  शेतीत धानाचे पीक टुमदार उभे आहे.सेंद्रीय शेतीमध्ये अधिक उत्पन्नाची ताकद असल्याचे आनंदराव  शेंडे ठामपणे सांगतात.खर्च कमी पण,उत्पन्न जास्त हा बचतीचा तेवढाच समृदधीचा महामार्ग असल्याचे आवर्जून सांगतात.तालुक्यातील शेतक-यांनी सुदधा अशाच पदधतीने धानाची शेती करावी असे त्यांनी आवाहन केले आहे. धानाच्या शेतीला खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी ओरड असते.मात्र आनंदराव शेंडे त्याला अपवाद ठरले आहे. सेंद्रीय शेतीचा प्रयोग त्यांनी साध्य करून दाखविला आहे. आपल्या सेंद्रीय शेतीतील धानपीक दाखविण्यासाठी आनंदराव शेंडे यांनी भवराळा येथे ऑन द स्पॉद पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला भवराळा येथील शेतकरी नक्टू नन्नावरे,रमेश गायकवाड,सचिन कामडे,नरेंद्र घोडमारे उपस्थित होते.  
नुकसानीने हार मानली नाही:– नागपूर येथील कृषी तज्ज्ञ डॉ.मिश्रा  यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेलेले आनंदराव शेंडे यांना त्यांच्या प्रयोगात पहिल्या वर्षी नुकसान झाले.मात्र,ते नुकसानीने हारले नाहीत. झालेली चुक दुरूस्त करीत त्यांनी नव्या जोमाने हा प्रयोग सुरू ठेवला.त्यांच्याच राईस मील मध्ये डॉ.मिश्रा यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. निघालेले धानपीक कर्जापायी तात्काळ विकण्याची आवश्यकता नाही.त्यासाठी शेतक-यांनी आपल्या शेतीमध्ये धान साठवून ठेवण्यासाठी गोडावून बांधावे असे आवाहन त्यांनी केले.सेंद्रीय शेती माझ्या साठी लाभदायक ठरली आहे.शेतीतून माझा घरखर्च चालतो असे त्यांनी आवर्जून सांगितले. पंरपरांगत शेती ऐवजी आधुनिक शेतीवर शेतक-यांनी भर दयावा असे आनंदराव शेंडे म्हणतात. शेतात विहिर आणि बोअरवेल खोदून त्यांनी शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ घेतला आहे.उन्हाळी धान पीकासाठी शासनाने आसोला मेंढा कालव्याचे पाणी शेतापर्यंत सोडावे अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे. सिंचनाअभावी  दुबार पीक  घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे शेेडे यांचे म्हणणे आहे.
आरोग्य सुधारले:- मूल मध्ये मार्निग वॉक झाल्यानंर भवराळा येथे सकाळी त्यांचा शेतीत वेळ जातो.हातात काठी घेवून 75 वर्षीय आनंदराव शेंडे  आपल्या सेंद्रीय शेतीत पीकांची पाहणी करण्याकरिता फेरफटका मारतात.हिरवेगार प्रसन्न वातावरणामुळे त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला.शेती त्यांना क्रियाशिल ठेवीत असल्याने त्यांचे आरोग्य सुधारले.सदया ते ठणठणीत आहेत.सेंद्रीय पीकामुळे त्यांना मोठा फायदा झाला.